Friday, March 19, 2021

प्रणाली तू असं करायला नको होतंस....

बहिणीची मैत्रीण प्रणाली हिने आत्महत्या केल्याचे कळताच घरातील सर्वच सदस्यांना धक्का बसला. प्रणालीचे लग्न बँकेतील अधिकाऱ्यांसोबत ठरले हे सांगताना काही वर्षांपूर्वी ती स्वप्नांच्या दुनियेत रंगून गेली होती. वराकडील मंडळींनी हुंडा मागितला हे सांगताना मात्र तिचा चेहरा पडलेला होता. मुलीचे कल्याण होईल, ती सुखी राहील या आशेने तिच्या आई- वडिलांनी वराकडील मंडळींच्या प्रत्येक मागणी, गोष्टींची पूर्तता करून थाटात लग्न लावले. लग्नात अपेक्षेपेक्षा जास्त देऊनही सासरच्या मंडळींची 'डिमांड' काही कमी झाली नाही. संसाराचा गाडा थोडा पुढे पुढे सरकायला लागला की सासरची मंडळी माहेरहून हे आण, ते आण म्हणून तिच्याकडे 'डिमांड' करायचे. आई-वडिलांनी ह्यांना कितीही दिले तरी कमीच असतं हे प्रणालीला कळून चुकलं होत. अनेकदा 'ती' गप्प बसुन सासरच्या मंडळींचा छळ सहन करत गेली. यातच 'गोड' बातमी कळल्यानंतर ती होणाऱ्या छळाकडे दुर्लक्ष करत गेली. काही महिन्यांपूर्वी तिने एक गोंडस मुलीला जन्म दिला. आई झाल्याच्या आनंदात ती न्हाहून निघाली. पण तो क्षणही तिच्यासाठी क्षणिकच होता. मुलगी झाली म्हणून सासरची मंडळी नाराज होती. तिला बघायलाही कोणी आले नाही. आनंदाच्या क्षणी सासरच्या मंडळींचे असे वर्तन बघून तिला मानसिक धक्काच बसला. महिना, दोन महिने, तीन महिने उलटूनही सासरच्या मंडळींच्या अशा वर्तनामुळे ती मानसिक तणावात होती. माहेरी असताना नवरा-बायको यांच्यात फोनवर वाद झाला अन प्रणालीने मागचा-पुढचा विचार न करता टोकाचे पाऊल उचलून गळफास घेतला. तिच्या या निर्णयामुळे जसा आम्हाला धक्का बसला त्याही पेक्षा जास्तच तिच्या आई- वडिलांना बसलेला असेल. कोणाचं मन न दुखवणारी, हसऱ्या स्वभावाची मुलगी तिच्या एका निर्णयामुळे सर्वांना रडवत आहे. नराधम पती, हावरट स्वभावाची सासरची मंडळी यांना तू धडा शिकवायला हवा होता. परंतु, प्रणाली तुझी काहीही चूक नसताना तू स्वतःला शिक्षा करून घेतलीय. असं तू खरंच करायला नको होतंस. तुझा छळ करणाऱ्या प्रत्येकाला न्याय व्यवस्था शिक्षा देईल, पण तुझ्या त्या गोंडस मुलीच्या भविष्याचा तू विचार करायला हवा होतास. असतात गं सासरच्याकडील मंडळी हावरट. त्यांना कितीही केलं आणि कितीही दिलं तरी कमीच असते. मुलीसाठी आई-वडील काय काय सहन करतात हे कदाचित अनेकांना कळत नाही, कारण त्यांना मुलगी नसते ना. मुलगा म्हणजेच त्यांच्यासाठी सर्वकाही असतो. 'पती' म्हणजे हक्क गाजवणारा असतो. तो म्हणेल, सासरची मंडळी म्हणेल तीच दिशा त्यांच्यासाठी योग्य असते. हे तुला कळून चुकलं असेलच म्हणूनच रोजच्या छळाला कंटाळून तू मुक्ती मिळवून घेतलीय गं. पण या जगात असा त्रास सहन करणारी तू एकटी नव्हतीस हे कदाचित तू विसरली असावी. तुझ्यासारखे दुःख सहन करणाऱ्या अनेक 'प्रणाली' आजच्या घडीला सासरची मंडळी, पतींचा त्रास सहन करताय. त्यांच्याप्रमाणे तुही मनाने सक्षम राहून त्यांना धडा शिकविण्यासाठी दोन हात करायला हवे होतेस. होऊन होऊन काय झालं असत, तुला लोकांनी नाव ठेवलं असत. लोकांचे कामच असतं गं नाव ठेवणं. त्याकडे दुर्लक्ष करून तू त्या नराधमांना न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून धडा शिकवायचा होतास. प्रणाली, तू संयम बाळगायला हवा होतास. पण असं टोकाचं पाऊल उचलायला नको होतंस. देव तुझ्या आत्म्यास शांती देवा, भावपूर्ण श्रद्धांजली.