Wednesday, June 10, 2020

कोरोना स्टॉप करोना - भाग ७

कोरोना पॉझिटिव्ह आल्यापासून रूग्णालयातील प्रवास आतापर्यंतच्या भागामध्ये नमुद केलाय. खरी परीक्षा तर घरी गेल्यानंतर होणार होती. डिस्चार्ज झाला तरी मी पॉझिटिव्ह होतो. पुढील सात दिवस इतरांपासून विभक्त राहून स्वताची काळजी घेण्याचे डॉक्टरांनी सांगितले. सात ऐवजी १४ दिवसांपर्यंत एका खोलीमध्ये मी एकप्रकारे कैद होतो.


जिल्हा रूग्णालयातील डिस्चार्ज सोहळ्यानंतर घरी जाण्यासाठी बसची वाट पहावी लागली. पंधरा मिनिटांच्या प्रतिक्षेनंतर सिटी बस आली. अन्य रूग्णांचाही यात समावेश असल्याने खचाखच भरलेल्या बसमध्ये सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडालेला होता. पुंंडलिकनगर गल्ली नंबर एकसमोर दोघांना सोडण्यात आले. गल्लीमध्ये जाण्यासाठीचा रस्ता पत्र्यांनी पूर्णपणे बंद केलेला होता. आम्ही जाताच बाजूला बसलेले पोलिस कर्मचारी आले. तुम्ही डिस्चार्ज झालेले रूग्ण आहेत का? अशी विचारणा केल्यानंतर नाव, मोबाईल क्रमांक, आमचे फोटो काढले. आम्ही बाजूला असलेल्या जागेतून गल्लीमध्ये प्रवेश केला. मित्रांसह गल्लीतील रहिवासी स्वागतासाठी उभेच होते. घराजवळ जाताच गाणे वाजवून, फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. त्यांच्याशी बोलण्याचा मोह टाळून मी सरळ घरामध्ये गेलो.
----
गल्लीमध्ये एकप्रकारे कर्फ्यूच
गल्लीमध्ये आमच्या दोघांसह अन्य दोन जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते. अन्य दोघे आमच्या अगोदरच उपचार घेऊन ठणठणीत घरी परतलेले होते. डिस्चार्ज नंतरही मी पॉझिटिव्ह असल्याने गल्लीतील सर्वजण घाबरलेले होते. इतरांना त्रास नको म्हणून घराबाहेर न निघण्याचे ठरवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी लॉकडाऊन शिथिल झाल्याने वडील भाजीपाला आणण्यासाठी बाहेर गेले. १७ दिवसांपासून घरात जे होते तेच बनवून वडील खात होते. आम्ही आल्याने त्यांना बाहेर पडायला मिळाले. भाजीपाला घेऊन ते गल्लीत येताना त्यांना पोलिसांनी अडविले. त्यांच्या जवळील दुचाकी पोलीस सोडत नव्हते. त्यांनी घरी येऊन हा प्रकार सांगितला. मी स्वतः बाहेर जावून गाडी घेऊन आलो. यासाठी पुंडलिकनगर पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांशी चर्चाही करावी लागली. बस्स हा प्रसंग वगळता पुढील १४ दिवस घराबाहेर पडलेलो नव्हतो. नेहमी किलबिलाट असणाऱ्या गल्लीमध्ये पॉझिटिव्ह रूग्ण निघाल्यानंतर एकप्रकारे कर्फ्यूसारखे वातावरण तयार झालेले होते. (अनेकांची मने दुखावेल या हेतूने खऱ्या परिस्थितीचे वर्णन करणे टाळत आहे.) 
----
वडील बनले होते ‘आत्मनिर्भर’

आमच्या रूग्णालयातील पहिल्या दिवसांपासून डिस्चार्ज होईपर्यंत वडीलांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. स्वताच्या हाताने जेवण बनवून खाणे, बाहेर न निघणे, कोणाशी संवाद न साधणे इतकेच काय बहिष्कार टाकलेल्या व्यक्तींप्रमाणेच त्यांना रहावे लागले. कधी स्वताच्या हाताने पाणी न घेणाऱ्या वडीलांवर स्वता जेवण बनविण्याची वेळ आली होती. स्वयंपाक कसे बनवायचे याचे धडे ‘व्हिडीयो कॉलींग’द्वारे आईकडून त्यांना मिळत होते. १७ दिवसांमध्ये आत्मनिर्भरतेने ते पूर्णपणे ‘स्वयंपाकी’ बनले होते. २० मे २०२० आम्ही डिस्चार्जनंतर घरी येण्यापासून हे लिहिपर्यंत अर्थात १० जूनपर्यंत त्यांनी स्वता आमच्यासाठी स्वयंपाक बनविला आहे. अजूनही त्यांची ही मोहिम सुरूच आहे. याकाळात त्यांनी दररोज आमच्या प्रकृतीबद्दल माहिती जाणून घेत होणारा त्रास-सुधारणा हे डायरीमध्ये लिहून ठेवलय. दररोज येणाऱ्या फोनची नोंदसुध्दा त्यांनी डायरीमध्ये करून ठेवली आहे. ते दररोज नोंद करत असलेली डायरी माझ्या हाती लागल्याने डायरीचे गुपीत मला कळले. आम्ही केवळ कोरोनाग्रस्त होतो. परंतु, ते आमच्यापेक्षाही जास्त दुखाने ग्रस्त होते. त्यांना होणारे दुख ते कोणाला सांगू शकत नसले तरी माझ्या निदर्शनास येत होते.
--------
पुन्हा मला अ‍ॅडमिट होण्यासाठी फोन

घरी येऊन एक दिवस उलटत नाही तोच तुमचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याने अ‍ॅडमिट व्हावे लागेल, असा फोन आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला. मग डिस्चार्ज का दिला? असा प्रश्न मी उपस्थित केला. आम्हाला काही माहित नाही, अ‍ॅम्बुलन्स येईपर्यंत तुम्ही तयारी करा असे समोरील व्यक्तीने सांगितले.  पत्रकार मित्र आणि कार्यालयातील वरिष्ठांना हा प्रकार सांगितला. काही मिनिटांमध्येच मनपा आरोग्य अधिकाऱ्यांनी माझ्याशी संवाद साधला. नेमकी कोणाचा फोन आलता?, तुम्हाला काही त्रास आहे का?, अशी विचारणा करत आता अ‍ॅडमीट होण्याची गरज नाही. तुमच्यापासून कोणाला धोका नाही अन् कोणापासून तुम्हालाही धोका नाही असे म्हणत आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत काही औषध पाठवत असल्याचे सांगून काही त्रास असेल तर सायंकाळी पुन्हा कळवा असे त्या म्हणाल्या. त्यावेळी माझी प्रकृती चांगली होती. फक्त खोकला अन घस्यात थोडा त्रास होता. याची कल्पना मी त्यांना दिली. ( सायंकाळी मात्र त्यांना फोन करून प्रकृती बद्दल माहिती देण्यास मी विसरलो) आरोग्य अधिकाऱ्यांच्या फोननंतर पंधरा मिनिटानंतर लगेचच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी औषधी आणून दिल्या. घडलेला प्रकाराचे वृत्त दैनिकांमध्ये प्रकाशित झाले. नागरीकांनी हे वृत्त छापण्यामागील हेतू लक्षात न घेता वेगळीच चर्चा सुरू केली. पॉझिटिव्ह रूग्णावर घरात उपचार सुरू आहे, अशी चर्चा, अफवा सोशल मिडियाच्या माध्यमातून पसरविण्यात आली. या प्रकारानंतर अधिकच मनस्ताप झाला.
----------
मनाला कोरोना होऊ देऊ नका

ताप, अंगदुखी, अशक्तपणा, श्वास घेण्याचा त्रास, पोट खराब होणे, डोकेदुखी आदी सर्वसाधारण लक्षणे कोरोनाची आहे. लक्षणे जाणवू लागले की डॉक्टरांचा सल्ला, तपासणी करून घेणे हाच कोरोनाला वेळीच रोखण्याचा उपाय आहे. नेमकी काय त्रास होतोय, हे डॉक्टरांना न घाबरता मनमोकळ्यापणाने सांगायला हवे. अनावधानाने कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर कोणत्याही प्रकारचे दडपण घ्यायला नको. मधुमेह, श्वसन, किडणी, ह्दयरोग आदी समस्या तसेच वय जास्त असेल तर जास्तीची काळजी घ्यायला पाहिजे. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनेनुसार गोळ्या घ्यायला पाहिजे. चांगल्या गोष्टींमध्ये मन रमवायला पाहिजे. कोरोना व्हायरसची लक्षणे ही केवळ शरीरापर्यंत मर्यादीत असते. कोरोना मनापर्यंत पोहचला तर सर्वकाही संपल्याची भावना निर्माण होते. त्यामुळे मनाला कधी कोरोना होऊ देऊ नका, असे आतापर्यंतच्या व्यक्तिगत अनुभवावरून वाटते.
--------
नकळतपणे पसरतो आजार

कोरोना कसा होतो, यासंदर्भात कोणीही स्पष्टपणे सांगू शकत नाही. मी पत्रकारितेच्या निमित्ताने बाहेर वावरताना सर्व प्रकारची काळजी घेत होतो. सॅनिटायझर, मास्क यासह वेळोवेळी हात धुणे हा प्रकार करतच होतो. सर्व नियमांचे पालन करूनही कळत न कळतपणे कोरोना घरापर्यंत येऊन पोहचला. कोरोना संसर्गजन्य असल्याने तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत सहज पोहचतो. प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेनुसार त्याची लक्षणे इतर पॉझिटिव्ह रुग्णांमार्फत इतरांपर्यंत पोहचू शकतात. याशिवाय खोकला, शिंकणे तसेच थुंकल्याने या आजाराच्या विषाणूंचा प्रसार होतो. त्या विषाणूच्या संपर्कात असलेल्या वस्तू, व्यक्ती किंवा पदार्थांवर ते विषाणू जावून बसतात. हवेद्वारे कोरोना विषाणू पसरत असल्याने परिसरातील व्यक्तींना नाक, तोंडावाटे कोरोणाचा बाधा होऊ शकतो.
आगामी काळामध्ये कोरोनासोबतच सर्वांना जगायचं आहे ही मानसिकता आतापासूनच बनवून घ्यायला पाहिजे. उन्हाळ्यानंतर आता पावसाळा आणि नंतर हिवाळा या ऋतूत साथीचे आजार होणारच आहे. यातच कोरोनाचा फैलाव होऊन कोरोनाग्रस्तांच्या आकड्यांमध्येही प्रचंड वाढ होणार आहे. इतर सर्वांनाच कोरोना पसरवणारे संभाव्य शरीर म्हणून सर्वांना बघावे लागणार आहे. हा विचार करूनच सर्वांनी सावधानता बाळगुनच कामकाज करणे गरजेचे आहे. हे करताना माणसात अंतर असावे माणुसकीत नव्हे.
कोरोना भितीचा विस्तार वाढवण्यापासून रोखण्यासाठी आपल्या मनातली संवेदना जिवंत ठेवणे गरजेचे आहे. हीच संवेदना आपल्या भीतीला आपलाच शत्रू होण्यापासून रोखू शकणार आहे. कोरोनामुळे लोकांमध्ये इतका स्वार्थ आणि जगण्याचा मोह निर्माण झाला की जगण्यासाठी इतरांशी अमानुषपणे वागायलाही माणूस मागे-पुढे बघत नाहीये. समाज आणि परंपरेतील मूल्य या कोरोनाने नष्ट केलीय. या मूल्यांबरोबरच संवेदना, संवाद, आपुलकी, सहकार्य यासारख्या भावना कोमजल्या आहेत. आज असलेला कोरोना भविष्यामध्ये नष्ट होणारच आहे. यास विलंब लागेल मात्र कोरोनासोबत जगण्याची सर्वांनी दर्शविली पाहिजे. संवेदना, संवाद, आपुलकी या कोमेजलेल्या भावनांना नवचेतना प्रदान करणे गरजेचे आहे. भीतीने भयभीत न होता या आजाराला सामोरे गेलेल्यांना धीर देण्याचे काम आगामी काळात झाल्यास नक्कीच कोरोनाशी दोन हात करण्यास सर्वजण यशस्वी होतील. माझा उपचारानंतरचा कॉरन्टाईन पिरियड संपलेला असला तरीही अजून घरामध्येच आहे. लवकरच फिल्डवर येणार असल्याने आपल्याशी नक्कीच संवाद, भेट होईल. (आतापर्यंतचे सर्व अनुभव लिहिताना कोणाचे मन दुखावण्याचा हेतू मुळीच नव्हता. किंवा जाणूनबुजून कोणाला टार्गेटही करण्यात आलेले नाही. जे घडलय तेच मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोरोनाने इतरांना स्वार्थी बनविलेले असले तरीही मी जसा होतो तसाच आगामी काळात राहणार आहे. इतकेच नव्हे तर त्यापेक्षा अधिक इतरांच्या मदतीसाठी कसा येईल यासाठी प्रयत्नशील असेल. यासाठी आपल्या सर्वांची मदत, सहकार्य नक्कीच लागणार आहे.) {समाप्त}

नाभिक समाजावर टिका करणाऱ्यांनी थोडा विचार करा....

नाभिक समाजावर टिका करणाऱ्यांनी थोडा विचार करा....

डोक्यावरचे केस वाढले की पुरूष मंडळी सलूनमध्ये जातात आणि केस कापूण घेतात. कारण प्रमाणापेक्षा अधिक वाढलेले केस त्रासदायक ठरतात. थोडक्यात ‘केस कापणे’ ही एक गरजेची बाब आहे. केस कापण्याचे काम साधेसुधे नाही. हे काम अतिशय कौशल्याने करावे लागते. प्रामाणिकपणे ग्राहकांची सेवा करण्याचे काम हा समाज पिढ्यानपिढ्या करीत आहे. जसजशा ग्राहकांच्या गरजा वाढत गेल्या तशाच पध्दतीने या समाज बांधवाने आपल्या व्यवसायात बदल केले. हा बदल करताना त्यांना अनंत अडचणींचा सामना आला असेल किंवा अद्यापही येत असेल. हा व्यवसाय थाटण्यासाठी दुकानाची गरज असते. दुकान मालकांकडे ठराविक रक्कम जमा करून सुमारे पाच हजारांपासून २५ हजारांपर्यंत साधा दुकानचालक दरमहा भाडे देत आहे. ज्यांनी सलून व्यवयासाला अत्याधुनिकतेचे रूप दिले त्यांच्या दुकानांचे भाडे लाखांच्या घरापर्यंत आहे. याशिवाय दुकानामध्ये अत्याधुनिक यंत्रसामुग्री, कॉस्मेटिक तसेच ग्राहकांच्या गरजेनुसार अन्य बाबींचा समावेश दुकान चालक, मालकाला करावा लागतो. स्पर्धेच्या काळामध्ये असे न केल्यास ग्राहक दुरावण्याची शक्यताही असते. हाच विचार करून कर्जांचा डोंगर डोक्यावर घेऊन अनेकांनी ग्राहक हित जोपासण्यासाठी यात उडीही घेतली आहे. याच दुकानांमध्ये काम करणाऱ्या कारागिरांची समस्याही अशीच काहीसी आहे.
या समाजातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांकडे शेती नाही. दुकाने, राहती घरे भाडेपट्याने घेतली आहे. भाडे, वीजबील, कर्ज, घरचा खर्च, औषधांचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च इतर उधार उसनवारी आदी खर्च प्रत्येकावर आहे. कोरोनाच्या लॉकडाऊननंतर आता सरकार टप्प्याटप्याने व्यवहार खुले करत आहे. मात्र सलून-पार्लर व्यवसायाला अद्यापही मंजुरी न दिल्याने सलून दुकानदार आणि कारागिरांमध्ये काळजीचे वातावरण आहे. दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी यासाठी हा समाज आंदोलनाचे हत्यार उपसत आहे. राज्य शासनाच्या विरोधात पुकारलेल्या या आंदोलनानंतर अनेकांनी समाजाला टीका करण्यास सुरूवात केली. आंदोलन करण्यासंदर्भात कोणीतरी उचकवलं असेल, याच समाजाला आता अडचणी निर्माण होत आहेत का?, दर वाढविल्याचे फळ भोगा आता, दुकाने बंद करून घरीच बसा अशा प्रकारच्या टिका टिपणीही समाजावर होत आहे. या टिका-टिपणी करणाऱ्यांची खऱ्या अर्थाने किव येते. स्वतःबरोबर इतरांची काळजी घेणाऱ्या या समाजाची कला आता तुम्हाला सोपी वाटतेय म्हणूनच तर हे सुरू नाहिये ना..? लॉकडाऊनच्या काळात सलून दुकाने बंद असल्याने केस-दाढी वाढल्यानंतर समाजाची अनेकांना आठवण नक्कीच आली. डोक्यावरील वाढलेले केस, दाढी या समस्येवर पर्याय शोधत अनेकांनी घरच्या घरी कटिंग, दाढी करण्याची मोहिम हाती घेतली. अत्याधुनिक मशिनरीचा वापर करून ‘टक्कल’ही केले. बायका, पोरांची ‘कलाकारी’ चर्चेत येण्यासाठी अनेकांनी सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल केल्या. ऐरवी दाढी करताना एखादा केस राहिल्यावर चुका दाखवून देणारा ग्राहक लॉकडाऊनच्या काळात बायकोच्या चित्रविचित्र ‘कलेला’ दाद दाखविताना दिसला. आपल्याच घरातील सदस्यांकडून केसकर्तन करणाऱ्या त्या चित्रविचित्र प्राण्यांबद्दल आदरभाव आहेच. कारण लॉकडाऊनने त्यांच्यातील, घरातील सदस्यांच्या कलेला सर्वांसमोर आणून जिवंतपणा दिला.
आता कोरोनाच्या पाश्वभूमीवर नाभिक समाजातील चालक-मालकांनी दुकानांमध्ये बदल करण्यास सुरूवात केले आहे. ग्राहकांना धोका नको, म्हणून खबरदारी बाळगण्यासाठी दुकानांमध्ये सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरूवात केली. दुसऱ्यांचेच आरोग्य जपण्यासाठी हा खटाटोप समाजबांधवाने सुरू केला. हे करताना त्यांना आर्थिक झळही सोसावी लागत आहे. याचा ताळमेळ घालण्यासाठी समाज बांधवांनी आपल्या सेवेच्या दरांमध्ये थोड्या-फार प्रमाणामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. सर्व बाबींचा विचार केल्यास दरवाढीचा निर्णय योग्यच आहे. असे असतानाही आपली तलब पूर्ण करण्यासाठी दररोज १० रूपयांपासून हजारो रूपये खर्च करणाऱ्यांनी दरवाढीवर तोफ डागण्यास सुरूवात केली आहे. इतके कुठे दर असतात का?, जास्तच माजलेत हे असे म्हणत सोशल मिडियावर पोस्टही व्हायरल करण्यास सुरूवात केली आहे. याचा खेद नव्हे अशा लोकांच्या मानसिकतेची कीव येते. या लोकांनी मोबाईलमध्ये बोटं हलवून एखादी पोस्ट व्हायरल करताना विचार करावा. टिका-टिपणीला उत्तर देण्यास या समाजातील प्रत्येकजण तयारच आहे. सहनशिलतेचा अंत कोणीही पाहू नये. जर दरवाढ पटत नसेल तर लॉकडाऊनच्या काळात वापरलेला फंडा या सर्वांसाठी खुला आहे. अशा प्रकारे कोणाच्या कलेचा अनादर, समाजाच्या भावना दुखविण्याचा अधिकार कोणत्याही मंडळींना नाही.




Tuesday, June 9, 2020

कोरोना स्टॉप करोना - भाग ६

औषधोपाचार सुरू असल्याने होणारा त्रास कमी होत होता. आईच्या प्रकृतीत चार दिवसांमध्येच सुधारणा झाली. मला मात्र खोकला आणि घश्यामध्ये त्रास सुरूच होता. दहा दिवसांच्या उपचारानंतर दोघांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मला त्रास कायम असल्याने पुन्हा रिक्स नको म्हणून उपचारानंतर पुन्हा लाळेचे नमुने (स्वॅब) घेण्यात यावा, अशी विनंती माझ्यासह मित्रांनी डॉक्टरांकडे केली. त्यानुसार १४ मे २०२० दोघांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. यातच १५ मे २०२० रोजी पुंडलिकनगर भागातील काही रूग्णांना दहा दिवसांच्या उपचारानंतर डिस्चार्ज (उपचारानंतर स्वॅब तपासणी न करता) देण्यात आला. आम्हा दोघांना डिस्चार्ज का मिळाला नाही याची चर्चा यानंतर रंगू लागली. अनेकजण डिस्चार्ज बद्दल फोनद्वारे विचारणा करू लागले. स्वॅब नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर डिस्चार्ज मिळेल असे सर्वांना सांगत होतो. दोन दिवस उलटूनही स्वॅबच्या रिपोर्टबद्दल मला समजले नव्हते. सोर्सकडून दररोज मिळणारी माहितीही मिळाली नव्हती. विचारणा केल्यानंतर ते केवळ पेन्डींग असल्याचे सांगत होते. कोणाच्याही रिपोर्टला दोन दिवस लागत नाहीत. नेमकी आमचेच रिपोर्ट पेन्डींग का? असा प्रश्न पडू लागला. प्रश्नाचे उत्तर जाणण्यासाठी एका डॉक्टरांना फोन केला.
-----
नंतर समजले माहिती लपविल्याचे

मुळात दोघांचे रिपोर्ट दुसऱ्या दिवशीच आलेले होते. डॉक्टरांनी मला ते कळू दिले नव्हते. डॉक्टरांना फोन केल्यानंतर मला ही बाब समजली. दहा दिवसाच्या उपचारानंतर आमचे घेतलेले स्वॅब रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आले होते. त्रास जाणवत असल्याने माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह येणारच याची मला खात्री होती. आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यानंतर मला धक्का बसला होता. वडील, बहिण, आजी-आजोबा यांच्यासह अन्य नातेवाईकांना हे सांगितल्यास सर्वच चिंतेत पडतील या हेतुने त्यांच्यापासून ही माहिती मी लपविली. विचारणा केल्यानंतर नव्याने स्वॅब घेण्यात येईल, केव्हा घेतील हे सांगता येत नाही असे उत्तर देत होतो. सर्वांनाच असे लपविणे योग्य न वाटल्याने वडीलांना हे सांगितले. त्यांनी चिंता करू नका, काळजी घ्या असे म्हणत धिर दिला.
----
रिपोर्ट काहीही येवो डिस्चार्ज घ्यावा लागेल

रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर होणारा त्रास जाणून घेऊन औषधी देण्यात आल्या. तीन दिवसांच्या उपचारानंतर आईला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत नव्हता. १२ दिवस उपचार घेऊनही मला खोकला अन् घश्यात त्रास कायम होता. १८ मे २०२० सकाळी डॉक्टर तपासणीसाठी आले. दुपारी दोघांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात येईल, असे सांगितले. परंतु, त्या दिवशी आमचे स्वॅब नमुने घेण्यातच आले नाही. १९ मे रोजी तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांनी तुमचा रिपोर्ट आल्यास दुपारी डिस्चार्ज मिळणार असल्याचे सांगितले. काल स्वॅब नमुने घेतलेच नाही रिपोर्ट कसा येईल? असा प्रश्न मी डॉक्टरांना केला. त्यांनी चौकशी केल्यानंतर स्वॅब घेणारे दोघांचे नमुने घेण्यास विसल्याचे कळले. मग आज नमुने घेऊन उद्या रिपोर्ट आल्यानंतर डिस्चार्ज मिळेल असे सांगून डॉक्टर निघून गेले. दुपारी १२ वाजेच्या सुमारास दोघांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. त्यानंतर काही वेळेतच जिल्हा शल्यचिकित्सकांचा फोन आला. रूग्णांवर उपचार करण्याचे गाईडलाईन बदललेले आहेत. दहा दिवसानंतर सर्वांनाच डिस्चार्ज देण्यात येत आहे. नव्याने स्वॅब घेणे नियमबाह्य असून तुमचे मात्र ते घेण्यात आलेले आहे. आता उद्याचे रिपोर्ट काहीही येवोत, तुम्हाला डिस्चार्ज मिळेल असे त्यांनी सांगितले. पॉझिटिव्ह आला तरीही डिस्चार्ज कसा देता येईल असा प्रश्न केल्यानंतर त्यांनी काही उदाहरणे मला दिली. हे मात्र मला पटले नाही. याची कल्पना सहकाऱ्यांना दिली. त्याच दिवशी एका वॉर्डामध्ये जमीनीवर रूग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे फोटो रूग्णाने आणून दिले. सत्यता पडताळणीसाठी तेथे जावून पाहणी केली. रूग्णाच्या मदतीने व्हिडीयो काढून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींपर्यंत पोहचविले. वृत्तपत्रे, चॅनल्सच्या मदतीने जिल्हा रूग्णालयामधील खरी परिस्थिती यानंतर सर्वांपर्यंत पोहचली. त्यानंतरच सुधारणा झाली की नाही हे मला डिस्चार्ज मिळाल्याने समजू शकले नाही.
----
आई निगेटिव्ह आणि मी पॉझिटिव्ह

दुसऱ्यांदा घेण्यात आलेला स्वॅब नमुन्यांचा रिपोर्ट आईचा निगेटिव्ह तर माझा पॉझिटिव्ह येईल अशी मला शंका होती. परिचयातील डॉक्टरांशी चर्चा करताना मी हे बोलूनही दाखवले. ‘पॉझिटिव्ह’ विचार करण्याची सवय असल्याने हा रिपोर्टही माझा पॉझिटिव्ह येईल असे ठामपणे त्यांना म्हणालो. काही वेळेस ‘निगेटिव्ह’ विचार महत्वपूर्ण असतात, तुम्ही इतर विचार सोडा अन् आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. २० मे रोजी सकाळीच सूत्रांच्या मदतीने रिपोर्ट मला समजला. यात आई निगेटिव्ह तर मी पॉझिटिव्ह निघालो होतो. आम्हा दोघांना डिस्चार्ज देण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली होती. पॉझिटिव्ह असल्याने डिस्चार्ज घेण्याची माझी मनस्थिती नव्हती. हा प्रकार प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींबरोबरच लोक प्रतिनिधींना निदर्शनास आणून दिला. डिस्चार्ज देऊ नये यासंदर्भात अनेकांनी अधिकाऱ्यांना फोन केले. मात्र, नियमांवर बोट ठेवून ‘सुंदर’पध्दतीने हाताळणी केली. मी वाद घालण्याच्या मनस्थितीत होतो. अनेकांनी असं करू नकोस, घरी उपचार सुरू ठेवूयात. पहिले आरोग्याकडे लक्ष दे, असा सल्ला दिल्याने मी माघार घेत डिस्चार्ज करून घेतला. डॉ. अर्चना भोसले, डॉ. महेश लढ्ढा, डॉ. संतोष नाईकवाडे यांनी या प्रकरणात महत्वपूर्ण भुमिका बजावली. आईला धिर देऊन मला काहीही होणार नाही याची खात्री दिली.
--------
अनेकांनी लावले तर्कवितर्क

पॉझिटिव्ह असतानाही मला डिस्चार्ज दिल्याने अनेकांनी नेमकी काय झाले यासंदर्भात तर्कवितर्क लावणे सुरू केले. काहींनी जिल्हा रूग्णालयातील खरी परिस्थिती सर्वांसमोर आणल्यामुळे डिस्चार्ज दिल्याचा तर्क लावला. मुळात, या प्रकारांमुळे अधिकाऱ्यांची माझ्याबद्दल नाराजी होतीच. परंतु, जिल्हा शल्यचिकित्सकांनी माझ्याशी अगोदरच डिस्चार्ज संदर्भात चर्चा केलेली होती. काही हितचिंतकांनी त्यात तर्कवितर्क लावून अफवा पसरविण्याचे काम केले. याने उपचार सुरू असताना समाजकार्य कशाला करायचे, कानाडोळा करायला हवे होते अशी चर्चाही रंगली. परंतु, दररोज घडणाऱ्या घडामोडी ‘एसआरटीवाय’ ग्रुपच्या सदस्यांना माहित होत्या. इतरांनी कितीही तर्कवितर्क लावून केलेली चर्चा माझ्यासाठी करमणूकच होती. (क्रमशः)



Monday, June 8, 2020

कोरोना स्टॉप करोना - भाग ५

तब्बल १७ दिवस रूग्णालयात राहणे आई आणि माझ्यासाठी पहिलीच वेळ होती. इतके दिवस एकट्याने काढणे दोघांनाही अवघड होते. या काळामध्ये सोशल मिडियाच्या माध्यमातून, फोनद्वारे मी सर्वांच्या संपर्कात होतो. येणारा प्रत्येक दिवस कसा जायचा हे मला समजून येत नव्हते. इतके दिवस आमचे कसे गेले याबद्दल... (भाग-५)

पहिल्याच दिवशी नर्सेसने आईच्या प्रकृतीबद्दल व्यक्त केलेली चिंता अन् एका रूग्णाचा झालेला मृत्यू हे ऐकून आईच्या मनात भिती निर्माण झालेली होती. त्यानंतरचे दोन दिवस आईची मनस्थिती खराबच होती. अशातच औषधी देण्यासाठी येणाऱ्या नर्सेस सोबत आईचा सलोखा निर्माण झाला. या नर्सेस माझ्या आणि आईमधील संवादाच्या दूत बनल्या. दोघांच्या प्रकृतीबद्दल माहिती जाणून घेऊन त्या आम्हाला सांगत. यातच पाच दिवस मला प्रचंड खोकला आणि घशामध्ये त्रास होता. एक दिवशी रात्री श्वास घ्यायला त्रास होत होता. डॉक्टरांनी गोळ्या वेळेवर घ्या, वाफ घ्या असा सल्ला दिला. त्यानुसार मी उपचार घेत होतो.
----
खिडकी अन् नर्सेस 

आम्ही दोघेही वेगवेगळ्या वॉर्डात असलो तरीही एका खिडकीतून एकमेकांना बघता येत होते. आईला माझ्या संपूर्ण हालचाली खिडकीतून स्पष्टपणे दिसत. मला मात्र, बेडवरून उठून आई काय करतेय हे बघावे लागत. खोकला असल्याने अनेकदा मी उठून बसायचो. माझा आवाज आल्यास आईचेही लक्ष माझ्याकडे वेधल्या जायचे. नेमकी काय झाले हे विचारण्यासाठी आई लगेच मला फोनद्वारे संवाद साधायची. एकेदिवशी रात्री दोन वाजेच्या सुमारास मला उलट्यांचा त्रास सुरू झाला. माझ्या आवाजाने आईची सुध्दा झोपमोड झाली. तिने लगेच फोन लावून चौकशी केली. काहीच झालेले नसल्याचे सांगितल्यावर आईला धिर मिळाला. नुसतं, वाफ घ्यायला खाली डोके करून बसलो तरी, काय झाले म्हणून आईचा फोन यायचा. एका खिडकीने आमच्या दोघांमधील प्रेम, जिव्हाळा, ममता, माया, आपुलकी कायम ठेवली होती. फोनवर प्रकृतीबद्दल सांगुनही आई नर्सेसकडे माझ्याबद्दल विचारणा करायची. नर्सेस आल्या की मी आईबद्दल पहिले विचारायचो. एकमेकांबद्दल विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची नर्सेसला सवय झाली होती. रुग्णालयातील प्रवासादरम्यान खिडकी आणि नर्सेस आमच्या दुवा बनल्या होत्या. आजही त्या खिडकीतून आईसोबत होणारा संवाद डोळ्यासमोर येत असतो.
-----
व्हिडीयो कॉलद्वारे सामुहिक चर्चा

घरातील सदस्यांचे असे विभक्त होणे कोणालाही सहन झालेले नव्हते. मला मित्रांचेच जास्त फोन येत असल्याने कुटूंबातील सदस्यांसोबत जास्त संवाद साधता येत नव्हता. आईचे मन रमण्यासाठी व्हॉटस्अप व्हिडीयो कॉलींगचा पर्याय सर्वांसाठी सोईस्कर बनला होता. एकाच वेळी चौघांना सहभागी करून प्रकृतीबद्दल विचारणा केली जायची. आम्हा दोघांबरोबरच वडीलांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत. इतरांना त्यांना मदत करणे शक्य नसल्याने ते स्वता जेवण बनवायचे. व्हिडीयो कॉलींगच्या माध्यमातून ते करत असलेले काम आईसह बहिणींना लाईव्ह बघायला मिळायचे. फोनवर बोलण्यापेक्षा व्हिडीयो कॉल करूनच संवाद साधणे हा पर्याय सर्व नातेवाईकांनी निवडला होता. रेंज प्रॉब्लेममुळे आईचा फोन न लागल्यास नातेवाईक मला फोन करायचे. खिडकीतून आवाज देऊन आईला फोनबद्दल सांगायचो. कॉन्फरन्सवर घेऊन नंतर त्यांचा संवाद सुरू व्हायचा.
------
सफाई कर्मचारी, जेवण पुरविणाऱ्यांची मदत

दररोज रूमध्ये साफ सफाईसाठी कर्मचारी यायचे. प्रकृतीबद्दल ते विचारणा करायचे. अन्य रूग्ण त्यांच्यासोबत कशा प्रकारे वागतात ते सांगायचे. १७ दिवसांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांसोबत चांगलीच ओळख झाली. जेवण देण्यासाठी येणाऱ्यांसोबतही चांगला सूर जुळला होता. वॉर्डातील रूग्ण नेमकी या दोघांनाच टार्गेट करायचे. रूग्णांचे हे वागणे मला पटत नव्हते. अनेकदा रूग्णांचे सफाई कर्मचारी, जेवण पुरविणाऱ्यासोबत वाद झाल्यास मध्यस्थीची भुमिका निभवायचो. उपचारानंतरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मला गरम पाणी पिण्याचे सांगण्यात आले. गरम पाणी कुठे उपलब्ध होईल, याची चर्चा जेवण पुरविणाऱ्यांसोबत केली. माझे काम झाले की मीच आणून देतो असे ते म्हणाले. त्यानंतर सलग ४ दिवस रात्रीच्या वेळी त्यांनी गरम पाणी आणून दिले. माझा अन् कर्मचाऱ्यांचा सलोखा अन्य रूग्णांना मात्र खटकत होता. (मदत करणाऱ्या नर्सेस, सफाई कर्मचाऱ्यांची नावे अर्धवट असल्याने नावाचा उल्लेख टाळण्यात आलाय)... क्रमशः

Sunday, June 7, 2020

कोरोना स्टॉप करोना - भाग ४ ,

भाग एक ते तीनमध्ये घडलेल्या घटना आपण नक्कीच वाचल्याच असतील. यात माझा हॉस्पीटलपर्यंतचा प्रवास, अफवांनंतर घडलेल्या घटना, जिल्हा रूग्णालयातील कारभार, रूग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांवर अधिकाऱ्यांची ‘सुंदर’पध्दतीने हाताळणी, नर्सेस आणि सफाई कर्मचाऱ्यांचा समजूतदारपणा मांडला. तसाच येथे दाखल होणाऱ्या रूग्णांचे कारनामेही समोर यायला हवेत. असेच काही कारनामे, किस्से, धावपळ मी डोळ्यासमक्ष पाहिलेल्या रूग्णांबद्दल. (भाग-४)


दोन दिवसांचा उपचार घेतल्यानंतर वॉर्डामध्ये बाहेर ठेवलेल्या जारमधून पाणी आणण्यासाठी जाताना एक-एक रूग्णांची ओळख होत गेली. नुर कॉलनीत राहणाऱ्या ६७ वर्षीय ‘बाजी’ची सर्वप्रथम ओळख झाली होती. १३ मे २०२० रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यांच्यासह वॉर्डातील अन्य तीन रूग्णांनाही सुट्टी मिळाली. ‘बाजी’ जोपर्यंत वार्डामध्ये होत्या, तोपर्यंत मला कोणत्याही प्रकारची चिंता नव्हती. सकाळी नाश्ता, दुपार अन् रात्रीचे जेवण आल्यानंतर त्याच मला आवाज द्यायच्या. मी झोपलेलो असलो तरी त्या पुन्हा पुन्हा आवाज देऊन उठवायच्या. घरच्या सदस्यांप्रमाणेच त्यांनी काळजी घेतली. त्यांना डिस्चार्ज देताना त्यांचे स्वागत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. हा सोहळा संपल्यानंतर अधिकारी कार्यालयात निघून गेले. परंतु, त्या दिवशी ज्यांना ज्यांना डिस्चार्ज मिळाला त्यांना प्रशासनाच्या गलथान कारभाराबद्दल मनस्ताप झाला. त्यांना घरापर्यंत पोहचविण्यासाठी अ‍ॅम्बुलन्सची सुविधा विलंबाने करण्यात आली. सुमारे दोन तास डिस्चार्ज झालेले रूग्ण जिल्हा रूग्णालयाच्या पायरीवर बसून अ‍ॅम्बुलन्सच्या प्रतिक्षेत होते. वॉर्डातील अन्य रूग्णांना त्यातील एकाने कल्पना दिली. त्यांनी मला हा प्रकार सांगितल्यानंतर अधिकाऱ्यांना यासंदर्भात बोललो. त्यांनी तत्काळ त्या रूग्णांना घरापर्यंत पोहचविण्यासाठी व्यवस्था केली.
----
अन् एक-एक रूग्ण भेटत गेले
वॉर्डातील रूग्णांना एक-एक करून डिस्चार्ज मिळाल्याने अन् रूग्ण उपचारासाठी दाखल होत होते. १५ मे रोजी रात्रीच्या दरम्यान तीन नवीन रूग्ण वॉर्डात दाखल झाले. सेवानिवृत्त अधिकारी त्यांच्या पत्नी आणि मुलासह कोरोनाबाधित झाले होते. सेवानिवृत्तीनंतर ते एका शासकीय कार्यालयात काम करत असल्याचे त्यांनी ओळखीदरम्यान सांगितले. १६ मे रोजी सकाळी ८ च्या सुमारास ते नर्सेसशी संवाद साधत होते. त्यांना स्वतंत्र रूम, एसी नसेल तर कुलर, पिण्यासाठी थंड पाणी, सेपरेट टॉयलेट-बाथरूम असावे अशी फरमाईश ते नर्सकडे करत होते. त्यांच्या या मागण्यापाहून नर्सेस बरोबरच मीही अवाक झालो. ११ वाजून गेले तरीही त्यांची 'फर्माईश' पूर्ण होत नसल्याने त्यांनी ‘ओळख’ दाखवायला सुरूवात केली. त्यांनी कुठं-कुठं काम केलंय, त्यांच्या ओळखी कुठपर्यंत आहे याची कथा नर्सेसला सांगू लागले. कोणत्याही मागण्या मान्य होऊ शकत नाही, असे स्पष्टपणे नर्सेसने सांगितल्यानंतर त्यांनी ‘ओळखी’चा वापर करण्यास सुरूवात केली. ‘ओळखी’च्या संपर्कानंतर अधिकाऱ्यांपर्यंत त्यांच्या समस्याही पोहचल्या. त्यानंतर माझ्या समोरील, बाजूची अन् तिसरी थोडी लांब याप्रकारे तिघांनाही स्वतंत्र रूम देण्यात आली. इतके करूनही त्यांचे समाधान झालेले नव्हते. दुपारी १ वाजेच्या सुमारास जेवण आल्यानंतर त्यांनी जेवण देणाऱ्यांसोबतच वाद घातला. भात नको, पोळ्या जास्त द्या, थंड पाण्याची व्यवस्था करून द्या अशी मागणी करू लागले. जेवण आणून देणारा त्यांच्याकडे बघतच राहिला. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास चहा घेताना त्यांना कागदाच्या कपात नव्हे तर ग्लासमध्ये तो हवा होता. त्यांचा स्वभाव जेवण-चहा आणून देणाऱ्याच्या लगेच लक्षात आला. रात्रीचे जेवण देताना या तिघांना पहिले वाटप करण्यात आले. त्यांना भात नको तर पोळ्या असं फर्माइशनुसार देण्यात आले. तरीही या रूग्णाचे मन काही भरले नाही. दुसऱ्या दिवशी जेवणाचा दर्जा खराब असल्याबद्दल त्यांनी वाद घातला. त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने शेवटी या रूग्णाने घरी उपचार घेतो. मला डिस्चार्ज द्या, असा तगादाच प्रशासनाकडे सुरू केला. त्यांच्या मागण्या वाढतच असल्याने एका महिला डॉक्टरने त्यांना चांगलेच सुनावले होते. त्यानंतर नर्सेस, जेवण देणाऱ्यांच्या तक्रारी करण्यात येईल, अशी धमकी ते देत गेले. रूग्णाच्या अशा वर्तवणुकीला, वारंवार होणाऱ्या मागण्याला कंटाळून पाचच दिवसांमध्ये अर्थात २० मे २०२० रोजी प्रशासनाने त्यांना डिस्चार्ज दिला. मुळात रुग्णाला अपूर्ण उपचारविना सोडणे कितपत योग्य होते, हे समजू शकले नाही. दरम्यान, या रूग्णांनंतर मात्र वार्डातील वातावरणही बिघडून गेले. अन्य रूग्णही सोईनुसार उपचार होण्यासाठी त्यांची ‘ओळख’ कुठपर्यंत आहे हे दाखवत होता. एकाने तर आरोग्य मंत्र्यांच्या पी.ए. मार्फत अधिकाऱ्याकडून सोय करून घेतली. २० मे रोजीच मलाही डिस्चार्ज मिळाल्याने पुढे काय झाले हे तेथील कर्मचारीच जाणो.
----------
दोन रूग्ण, नातेवाईकांची दैना बघवेना....

जिल्हा रूग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रूग्णांची प्रकृती १४ मे रोजी अचानक बिघडली होती. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (घाटी) हलविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. घाटी प्रशासनाशी जिल्हा रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी फोनवर संपर्क साधला. ऐनवेळी घाटी प्रशासनाने नकार दिल्याने या रूग्णावर जिल्हा रूग्णालयातच उपचार करण्याची नामुष्की ओढवली. रूग्णांचा जीव वाचविण्यासाठी जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. रात्रभर केलेल्या उपचारानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. तर १८ मे रोजी एका सिरियस रूग्णांच्या पत्नीची दैना डोळ्यासमक्ष बघितली. माझ्या वॉर्डासमोरील वॉर्डात हिमायत नगर, हिमायत बाग येथील दोघा पती-पत्नीवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होता. सायंकाळी सात वाजेनंतर या रूग्णास श्वास घेण्यास त्रास झाला. याची कल्पना डॉक्टरांनी त्यांच्या पत्नीला दिली होती. शिवाय जवळच्या नातेवाईकास रूग्णालयात येण्यास बोलवा, असेही कळविले होते. उपचार घेणारी त्यांची पत्नीही वृध्द असल्याने काय करावे, कुठे जावे, कोणाला सांगावे अशी स्थिती त्यांच्यासमोर होती. जवळ मोबाईल असताना त्यांना अज्ञानामुळे स्मार्टफोन हाताळता येत नव्हता. डॉक्टरांसह इतर कर्मचारी त्यांच्या पतीच्या उपचारासाठी धावपळ करत होते. आजूबाजूच्या रूग्णांना नंबर लावून द्या अशी विनवणी त्या करत होत्या. मात्र, अन्य रूग्णांनी त्यांना दाद दिली नाही. माझ्या रूमचा दरवाजा त्यांनी वाजवला अन् फोन लावून देण्याची विनंती केली. त्याच दिवशी दुपारच्या वेळेस त्या माझ्याकडे आल्या होत्या. माझ्या पतीला साध्या टॉयलेटमध्ये बसता येत नाही. त्यांना त्रास होतोय ‘कमोट’ टॉयलेट कुठे उपलब्ध होईल हे सांगता येईल का? हे विचारण्यासाठी त्या आल्या होत्या. नर्सेसच्या कॅबीनमध्ये विचारणा केल्यास त्या सांगतील असे सांगून त्यांच्याकडे पाठवुन दिले होते. आता फोन लावून द्या, म्हणत असल्याने मीही गडबडलो होतो. नेमकी काय झाले? हे विचारल्यानंतर त्यांनी प्रकार सांगितला. त्या जे नाव सांगत होत्या, ते मी टाईप करण्याचा प्रयत्न करायचो. परंतु, नाव सेव्ह करताना स्पेलींग मिस्टेकमुळे त्या सांगत असलेले नाव शोधूनही सापडत नव्हते. अखेर फोन लिस्टमधील एक-एक नाव वाचून दाखविल्यानंतर त्यांना हवे असलेल्यांचा नंबर मिळाला. पतीच्या प्रकृतीबद्दल कल्पना देऊन सुमारे दोन तास होऊनही नातेवाईक तिथे आलेले नव्हते. दोन तासानंतर त्या पुन्हा माझ्याकडे नंबर लावून द्या, असे म्हणत आल्या. दुसऱ्यांदा फोन झाल्यानंतर नातेवाईक तासाभरामध्ये रूग्णालयात पोहचले होते. तोपर्यंत या दोघांनाही घाटी रूग्णालयात हलविले होते. दुसऱ्या दिवशी माझ्याकडे पॉझिटिव्ह रूग्णांचा वाढलेला आकडा आणि झालेल्या मृत्यूची लिस्ट आली. यात रात्रीच्या रूग्णाचा मृत्यू झाल्याचे समजताच त्या वृध्द पत्नीची दैना माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली होती. त्या दिवशी दुपारपर्यंत मला करमले नव्हते. (क्रमशः)

Friday, June 5, 2020

कोरोना स्टॉप करोना - भाग ३

कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर घर ते जिल्हा रूग्णालयातील प्रवास, घडलेल्या घडामोडी भाग-१ आणि भाग-२ मध्ये नमुद केलेला आहे. रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल होण्याची तशी पहिलीच वेळ होती. कोरोनामुळे दहा ते बारा दिवस रूग्णालयात काढायचेच होते. आपण आणि आपले उपचार ही मानसिकता ठेऊन रहायचे हे ठरवले होते. जस जसे दिवस जात होते, तस तसे रूग्णालयातील कारभार प्रत्यक्षपणे बघावयास मिळत होते. अनेकदा कानाडोळा करण्याचा प्रयत्न केला. नंतर मात्र रूग्णांच्या समस्या, हाल बघणे सहन होत नव्हते. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांना होणारा त्रास कमी करण्याचा प्रयत्न मात्र यादरम्यान केला. (भाग-३)

४ मे रोजी रात्री जेवणानंतर गोळ्या घेतल्या. मोबाईल फ्लाईट मोडवर टाकून चित्रपट पाहताना झोप लागली. दुसऱ्या दिवशी ५ मे रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास नर्सच्या आवाजाने झोपेतून उठलो. शरीरातील आॅक्सीजनचे प्रमाण चेक करण्याबरोबरच सकाळच्या सत्रातील गोळ्या देण्यासाठी त्या आलेल्या होत्या. त्या गेल्यानंतर माझ्या संपर्कातील आणि अन्य जणांनी तपासणी केलेल्यांचे रिपोर्टबद्दल माहिती घेताना यात तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समजले. सुदैवाने माझ्या संपर्कातील त्यात कोणीही नव्हते. सकाळचा नाश्ता आल्यानंतर तो घेताना समोरच्या रूममध्ये उपचार घेणाऱ्या वृध्द महिला रुग्णाने माझ्याशी संवाद साधला. माझी माहिती घेतल्यानंतर त्यांच्याबद्दल सांगत होत्या. नूर कॉलनीतील असलेल्या त्या शासकीय रूग्णालयात नर्स मधून सेवानिवृत्त झाल्या होत्या. मुलींचे लग्न तर एकुलत्या एक मुलाचे निधन झाल्याने घरात दोघेच राहत होते. शेजारच्यांना कोरोना झाल्याने त्यांची तपासणी झाली अन् त्या पॉझिटिव्ह निघाल्या होत्या. कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत नसताना पॉझिटिव्ह आल्याचे त्या सांगत होत्या. रूमच्या दरवाज्यात उभा राहूनच त्यांच्याशी संवाद सुरू होता. सुमारे पंधरा मिनिटांच्या संवादानंतर रूममध्ये आलो. सकाळी १० वाजेच्या सुमारास माझ्या शेजारच्या रूममधील एक रूग्ण दगावल्याचे समजले. त्यानंतर दिवसभर सोशल मिडियाद्वारे घडामोडी जाणून घेणे, आलेले फोन अन् मिळालेल्या वेळेत चित्रपट बघणे हा प्रकार सुरू होता.
-----
अन् अचानक वॉर्डातील रूग्ण घाबरले
सायंकाळी साडे सातच्या सुमारास रात्रीचे जेवण आले. माझी रूम जवळच असल्याने सर्वप्रथम मी जेवणाचे पाकीट घेऊन रूममध्ये आलो. त्यानंतर वॉर्डातील एक-एक रुग्ण सोशल डिस्टन्स ठेऊन पाकीट घेत होते. एका रूग्णाने बाजूच्या रूममधून कोणी न आल्याने आवाज दिला. रूममधून दाद न मिळाल्याने त्याने दरवाजा लोटला तर समोर स्ट्रेचरवर मृतदेह दिसला. मृतदेह बघून तो घाबरला आणि इतरांनाही तिथे बोलविले. या रुग्णाच्या मृत्यूबद्दल ठराविक जणांनाच माहिती होती. दिवसभर तो मृतदेह न नेल्याने, कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे सर्वजण प्रचंड घाबरले होते. सकाळी ओळख झालेल्या ‘बाजी’ने मला कोणाला बोलून काही करता येईल का बघ, असे सांगितले. तत्काळ जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी मृतदेह दुपारीच तेथून नेलाय, असे उत्तर दिले. प्रत्यक्षात मृतदेह अनेकजण रूममध्येच असल्याचे बघताय अन् अधिकारी मृतदेह नसल्याचे सांगत असल्याचे आश्चर्य वाटले. प्रसारमाध्यमांच्या काही सहकाऱ्यांना ही माहिती दिली. सर्वांनीच अधिकाऱ्यांना एक -एक करून विचारणा केल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांतच मृतदेह रूममधून हलविण्यात आला. अधिकाऱ्यांच्या बेजाबदार ‘दक्ष’तेची प्रचिती यानिमित्ताने आली.  दुसऱ्या दिवशी लगेचच या रूमध्ये जंतुनाशक तपासणी करण्यात आली. त्यानंतरच दोन-तीन दिवस कसे गेले हे समजलेच नाही.
-----
मित्रांनी दिला मदतीचा हात
दरम्यानच्या काळामध्ये अनेकजण मदतीची विचारणा करत होते. सॅनिटायझर, वाफ घेण्यासाठी स्टिमर, पिण्याच्या पाण्याचे बॉक्स, जेवणासाठी ताट, स्प्रे पंपची आवश्यकता असल्याचे समजल्यानंतर श्री. प्रदिप विखे, श्री. बाळासाहेब हरबक पाटील यांनी ते उपलब्ध करून दिले. श्री. संतोष सोमाणी यांनी थेट लासुर स्टेशन येथून लॉकडाऊन असतानाही आयुर्वेदिक औषधे औरंगाबाद येथे पोहच केली. श्री. गिरीष काळेकर, उज्वला साळुंके, श्री. सचिन अंभोरे यांच्यामार्फत ते माझ्यापर्यंत घरी पोहचविले. काहीजण जेवणाच्या दर्जाबद्दल चर्चा करत होते. जवळच्या मंडळींना मला जेवणावरून होत असलेल्या त्रासाची जाणीव झाली होती. श्री. संजय गवळी पाटिल, श्री. रामेश्वर कोरडे या दोघांनी ड्रायफ्रूट उपलब्ध करून दिले. मला हवं ते मित्रांच्या माध्यमातून सर्वकाही मिळत होते. परंतु, इतर रूग्णांना फळांची मदत करण्याहेतू पुंडलिकनगर येथील ‘छत्रपती गणेश मंडळ’च्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सर्वांनी सकारात्मकता दर्शविताच आम्ही आपआपल्या परीने मदतनिधी जमा करून सुमारे ४०० किलो मोसंबीची खरेदी केली. सदस्यांनी एक-एक किलोचे पाकिट बनविले. माझ्याकडून जिल्हा रूग्णालयातील रूग्णांचा आकडा घेऊन १०० किलो अर्थात मोसंबीचे १०० पाकिट रूग्णालय प्रशासनाकडे सुर्पूद केले. उर्वरित मोसंबीचे पाकिट एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे उपचार घेणारे रूग्ण, पुंडलिकनगरातील १ ते ३ मधील रहिवाशांना वाटण्यात आले.
-----
अधिकारी केवळ नावापुरतेच
जिल्हा रूग्णालयातील अधिकारी हे केवळ नावापुरतेच असल्याची ओरड वेळोवेळी रूग्णांकडून ऐकावयास मिळाली. काही बोटावर मोजण्याइतके डॉक्टर, नर्सेस, साफसफाई कर्मचारी यांच्यावरच रूग्णालयाचा कारभार हाताळला जात होता. दोन ते तीन दिवसांमध्ये डॉक्टर रूग्णांना होणाऱ्या त्रासाबद्दल विचारणा करायचे. त्यानंतरची संपूर्ण जबाबदारी नर्सेसवरच असायची. आपल्या जीवाला जपूनच कोरोनाग्रस्तांवर उपचार प्रत्येकजण करायचे. रूग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे ‘सुंदर’ पध्दतीने कानाडोळा व्हायचा. अनेक वॉर्डांमध्ये रूग्णांच्या तक्रारी असायच्या. काही महिन्यापासून पगार न मिळालेल्या सफाई कामगारांकडून स्वच्छतेची अपेक्षा ठेवली जायची. सफाई कामगारांचे होणारे हाल बघूनही काही रूग्ण त्यांनाच टार्गेट करायचे. सफाई कामगारांनी मात्र अशा रूग्णांना नम्रतेने बोलूनच आपले कर्तव्य बजावले. (क्रमशः)

Thursday, June 4, 2020

कोरोना स्टॉप करोना - भाग २

कोरोना पॉझिटिव्ह झाल्यापासून हॉस्पीटलमध्ये जाण्यापर्यंतचा प्रवास भाग एकमध्ये नमुद केलेला आहे. तो अनुभव वाचल्यानंतर अनेकांनी मला सोशल मिडिया, फोनद्वारे संपर्क साधून अफवा पसरविणारे, नागरीकांच्या मानसिकतेबद्दल चर्चा केली. आता प्रत्यक्षात जिल्हा रूग्णालयात दाखल झाल्यानंतर कसा गेला पहिला दिवस याबद्दल....(भाग-२)

कोरोना पॉझिटिव्ह असो वा निगेटिव्ह रूग्ण, त्यांचे नातेवाईक यांना वार्तांकनाच्या निमित्ताने नेहमी भेटतच होतो. त्यामुळे मला कोरोना झाल्याचे काहीच वाटले नव्हते. फक्त आईला कोरोनाची लागण झाल्याची चिंता होती. कोरोना हा आजार नसून ते एक संकट असल्याने काही दिवसात या संकटावर मात करेलच असा विश्वास मला होता. ४ मे २०२० रोजी जिल्हा रूग्णालयात दाखल झाल्यानंतर परिचयातील नर्सने (त्यांना माझ्या हितचिंतकांकडून नंतर त्रास नको म्हणून नाव टाळतोय) उपचारासंदर्भातील संपूर्ण तयारी करून ठेवलेली होती. झोपेतून उठून आम्ही थेट रूग्णालयात आल्याचे आमच्याकडे बघून त्यांना दिसलेच होते. काही वेळानंतर त्यांनी दोघांना साबण, ब्रश, टूथपेस्ट, सॅनिटायझर, पाण्याची बॉटल, मास्क आणून दिले. आठ ते दहा दिवसांपासून आईची प्रकृती खराब असल्याने ती ‘सिरीयस’च दिसत होती. एका नर्सने अनावधानाने आईला पाहून ‘सिरीयस’ असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. मुळात, तो संवाद नर्स-नर्समधील होता. मात्र, आईने तो संवाद ऐकल्याने ती आणखीनच खाबरली होती. सतत सुरू असणारे फोन अन् मिळालेल्या वेळेत आईशी संवाद असाच खेळ सुरू होता. सकाळी साडे नऊच्या सुमारास नास्ता आला. यात उकडलेली अंडी आणि पोह्याचे पाकिट होते. काहीच खायची इच्छा होत नसल्याने माझ्याकडील नाश्त्याचे पाकिट तसेच ठेवून दिले. परिचयातील नर्सच्या ड्यूटीचा वेळ संपूनही त्या संपूर्ण व्यवस्था होईपर्यंत थांबलेल्या होत्या. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास एका वॉर्डामध्ये मला रूम देण्यात आली. रूममधून बाहेर निघू नका, अन्य रूग्ण हे तुमच्यापेक्षा जास्त सिरीयस आहेत, असे नर्सने दोघांनाही समजावून सांगितले होते. नंतर ड्यूटीवर आलेल्या नर्सला दोघांकडे लक्ष द्यायला सांगून त्या निघून गेल्या. त्यानंतर आईला धिर देत मी माझ्या वॉर्डामध्ये गेलो. वॉर्ड वेगवेगळे असले तरी दोघांच्या रूमच्या एका खिडकीतून आम्हाला एकमेकांना बघता येत होते. हिच खिडकी पुढील काळामध्ये दोघांना सहारा बनली होती.
----------
अन् असे सुरू झाले उपचार

सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दोघांची ईसीजी, ब्लड प्रेशर, रक्ताची चाचणी, छातीचे एक्सरे, आॅक्सीजनचे प्रमाण आदी तपासण्या करण्यात आल्या. एक वाजेच्या सुमारास वरण-भात, पोळी-भाजी असलेले पाकिट देण्यात आले. तत्पूर्वी नर्सने विविध प्रकारचे आठ गोळ्या असलेले पाकिट आणून दिले. गोळ्या खाण्यासंदर्भात सूचनाही देण्यात आल्या. या दिवसभरातील गोळ्या आहेत का? असे कुतूहलाने नर्सला विचारले. दिवसभराचे नव्हे हा दुपारचा डोस असून रात्री नव्याने देण्यात येईल असे नर्सने सांगितले. जेवण भरपूर करा नंतरच गोळ्या घ्या, असा सल्लाही त्या द्यायला विसरल्या नाही. जेवणाची इच्छाच होत नव्हती. परंतु, गोळ्या घ्यायच्या असल्याने कशीतरी एक पोळी खाल्ली. सतत फोन सुरू असल्याने सायंकाळचे साडे चार कधी वाजले हे कळलेच नाही. गोळ्यांचा डोस घेतल्याने सुस्ती येत होती. मोबाईल सायलेंट मोडवर टाकून बोलता बोलता कधी झोप लागली हे कळलंच नाही. रात्री आठच्या सुमारास झोपेतून उठलो. मोबाईल हातात घेतल्यानंतर अनेकांचे मिस कॉल पाहिले. त्यात आईचा फोन आलेला दिसल्याने तिच्याशी संवाद साधला. जेवण केलं का? अशी विचारणा तिने केली. दुपारचे जेवण झाले. आता रात्री आल्यानंतर करतो असे म्हणालो. अरे, जेवण तर सात वाजताच आले होते. तु घेतले नाहीस का? असा प्रश्न तिने केला. झोपलेलो होतो, त्यामुळे लक्ष नव्हते. कोणाला तरी सांगतो, तु काळजी करू नको असे म्हणत आईला आराम करण्यास सांगितले. तितक्यात सचिन अंभोरे या पत्रकार मित्राचा फोन आला. अडचणीसंदर्भात त्याने विचारणा केली. घडलेला प्रकार त्याला सांगितला. त्याने लगेच डब्बा आणून देण्याची तयारी दर्शविली. रूग्णांना नातेवाईकांना भेटता येत नसल्याने त्याला डब्बा आणू नको, दुपारचे जेवण उरलेलं आहे तेच खावून घेतो, तु निवांत रहा, असे म्हणत संवाद थांबविला. माझ्या नकारानंतर त्याने रूग्णालयातील डॉक्टरांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. लगेच डॉक्टरांचा मला फोन आला. जेवण आणून देणारा निघून गेल्याने सोय करता येणार नसल्याची कल्पना त्यांनी दिली. काहीच हरकत नाही, असे म्हणत नंतर दुपारी आलेले जेवनाचे पाकिट उघडले अन् त्यावर ताव मारून गोळ्या घेतल्या. गोळ्यांच्या सेवनानंतर गाढ झोप लागली.
------
‘ते’ विचारल्यावर चिड यायची
अनेकजण कोरोना नेमकी कशामुळे झाला यासंदर्भात फोनद्वारे चर्चा करायचे. यातील अनेकजण तुझ्यामुळेच आईला कोरोना झाला का? असा प्रश्न करायचे. माझ्यामुळेच आईला कोरोना झालाय हा ठपका सर्वांनी माझ्यावर मारलाय हे मला कळून चुकलेल होते. तरीही, हा प्रश्न ऐकुन प्रश्न विचारणाऱ्यांची चिड यायची. मी स्वताहून आईचा जिव धोक्यात कशाला टाकेल, हे लोकांना कसं समजत नाही यावर नेहमीच विचार करत बसायचो. नेहमीच विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाची नंतर सवयच करून घेतली. तर दुसरीकडे माझ्या संपर्कातील खास करून ‘एसआरटीवाय’ व्हाट्सअप ग्रुपमधील सदस्य संतोष हिरेमठ, रोशनी शिंपी, अर्पिता शरद, योगेश पायघन, प्रताप अवचार हे कोणी पॉझिटिव्ह निघाले नाही याचा आनंदही वाटायचा. मी पॉझिटिव्ह निघाल्यानंतर ‘एसआरटीवाय’मधील सदस्यांनी दाखविलेली समयसुचकता, माणुसकी, सहकार्य हे प्रोत्साहन देणारेच ठरले.
------
वडीलांच्या जेवनाची चिंता
उपचारासाठी सकाळीच रूग्णालय गाठल्याने वडीलांच्या जेवनाची चिंता सतावत होती. मित्रांना यासंदर्भात कल्पना दिली. मित्रांनी डब्बा पोहचवितो, चिंता करू नको असे सांगितले. याची कल्पना वडीलांना दिली. श्री. राजेंद्र गायकवाड, श्री. शेखर क्षिरसागर यांनी वडीलांना डब्बे पोहचविले. श्री. प्रशांत नाईक, श्री. शिवाजी गाडेकर, श्री. विष्णू जाधव यांनी वेळोवेळी आमच्या बरोबरच वडिलांच्या जेवणाच्या डब्ब्यासंदर्भात चर्चा करून पोहच करण्याबाबत स्कारात्मकता दर्शवली. परंतु, आम्ही पॉझिटिव्ह निघाल्यानंतर गल्लीतील वातावरणच (लोकांच्या मानसिकतेबद्दल भाष्य टाळतोय) बदलले होते. घरी येणाऱ्या व्यक्तीकडे, मदत करणाऱ्यांकडे वेगळ्याच नजरेने बघितल्या जात होते. हा प्रकार वडीलांनी आईला फोनद्वारे बोलून दाखविला. दोन दिवस या प्रकारापासून मी अनभिज्ञ होतो. डब्बे मिळताय का? अशी विचारणा वडीलांना केल्यानंतर हा प्रकार मला कळला. निशब्द होऊन वडीलांशी संवाद बंद केला अन् मुंबईत राहणाऱ्या बहिणीला फोन लावला. अशाच गप्पा मारताना तिने घरातील पीठ संपल्याने वडिलांना नंतर जेवणाचे वांदे होतील, असे सांगितले. दोन दिवसांपूर्वीच दळून आणलंय, असे ठामपणे मी बहिणीला म्हणालो. दळण अजून आणलेलं नाही. तू पॉझिटिव्ह निघण्याच्या एक दिवस अगोदर रात्री गहू गिरणीमध्ये नेले होते. रात्र झाल्याने गिरणी चालकांने सकाळी दळून देण्याचे सांगितल्याने दळण तिथेच ठेवलं होतं. मात्र, दुसऱ्या दिवशी तुम्ही पॉझिटिव्ह निघाल्यानंतर संपूर्ण दुकाने बंद ठेवण्यात आल्याने गिरणीत टाकलेलं दळण घरी आणताच आले नाही, असे बहिणीने सविस्तरपणे सांगितले. आता काय करावे अन् कोणाला सांगावे हे सुचत नव्हते. श्री. सागर मगरे यांना फोन करून परिस्थिती सांगितली. त्यांनी लगेच गव्हाच्या पिठाचे पाकिट वडीलांपर्यंत पोहचविले. त्यानंतर ‘आत्मनिर्भर’ होऊन वडीलांनी दिवस काढले. (त्यांच्या ‘आत्मनिर्भर’तेचा फायदा आम्हाला कसा झाला हे पुढील भागात नक्कीच सांगतो)
--------
अन् ‘त्यांचा’ सांभाळ कोण करणार

दोघेही पॉझिटिव्ह निघाल्यानंतर वडीलांची तपासणी होणार हे माहितच होते. घरामध्ये तिघांव्यतिरिक्त अन्य दोन सदस्य होते. त्यांचा सांभाळ कोण करणार? ही चिंता सतावत होती. श्री. रमेश राऊत यांना फोन करून ‘त्यांना’ घेऊन जा, असे कळविल्याचे वडीलांनी सांगितले. हे न पटल्याने मी लगेच नकार देत श्री. रमेश राऊत यांनाही ' त्यांना' घेऊन जावू नका अशी विनंती केली. पुढील परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे वडीलांना सांगितल्यानंतर त्यांनीही होकार दिला. सुदैवाने वडीलांचा अहवाल दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह निघाला अन् ते ‘दोन्ही’ सदस्य घरातच राहिले.
-------
दिलेली माहितीच झाली व्हायरल

माझ्या संपर्कात आलेल्यांची माहिती आरोग्य, पोलिस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी माझ्याकडून घेतली होती. मागील आठ दिवसांमध्ये मी कोणाच्या संपर्कात आलो, याची लिस्ट मित्राच्या मदतीने त्यांनी तयार केली. आणखी कोणाचे नाव राहिले का? किंवा कोणाला तपासणी करायची का? या हेतूने फायनल करण्यापूर्वी मित्राने ती यादी ग्रुपवर (पुंडलिकनगर गल्ली नंबर एक आणि दोनमधील युवकांचा ग्रुप) शेअर केली. ग्रुपवर यादी शेअर करणाच्या मित्राचा हेतू चांगला होता. परंतु, एका कॉपी पेस्टरने ती यादी अनेक ग्रुपवर शेअर केली. कॉपी-पेस्टरच्या व्हायरल पोस्टनंतर परिसरातील काहींनी ही यादी व्हॉटस्अप स्टेटसवर ठेवून अकलेचे तारे तोडले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर असे करणाऱ्याची चांगलीच खरडपट्टी झाली.
(तुर्तास भाग दोन इथे थांबवितो. )

Wednesday, June 3, 2020

कोरोना स्टॉप करोना - भाग 1

बघता बघता एक महिना पूर्ण झाला. ४ मे २०२० रोजी माझ्यासह आईचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह निघाला. त्यानंतर महिनाभरात अनेक चांगल्या-वाईट घटनांचा जवळून अनुभव घेतला. कोरोनाग्रस्तांकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन, मानसिकता बघितली. सर्वांच्या प्रेम, सदिच्छा, आशीर्वादामुळे आम्ही दोघेही कोरोनामुक्त झालो. यादरम्यान आलेल्या अनुभवाबद्दल लिहिण्याचा अनेकांनी सल्ला दिला. त्यानुसार घडलेल्या घटना, आलेला अनुभव सर्वांसोबत शेअर करतोय. इतकं वाचायचं का? असा अनेकांना प्रश्नही पडेल. मात्र, अनेक बाबी सर्वांसमोर आणणे, पसरविण्यात आलेल्या अफवांना ब्रेक देण्यासाठी इतके लिहिण्याशिवाय पर्याय नसल्याने सविस्तरपणे काही भागांमध्ये लिहितोय. (भाग १)

शंका आली अन् मी तपासणी केली

गेल्या अनेक वर्षांपासून मी आरोग्य बिटचे वार्तांकन करीत आहे. औरंगाबादेत कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (घाटी), चिकलठाण्यातील जिल्हा रूग्णालय (मिनी घाटी) तसेच खासगी रूग्णालयांमध्ये जाणे-येणे वाढले होते. माझ्यासोबत अन्य दैनिकातील आरोग्य बिटचे रिपोर्टर असायचे. दररोजच्या वार्तांकनाबरोबरच आम्ही धम्माल, मस्ती, जेवन पार्टी करायचो. लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर माझ्याकडे असलेल्या अन्य बिटातील कार्यालये बंद असल्याने तेथील बातम्यांचे प्रमाण कमी झाले होते. ‘कोरोना’ हा सर्वात चर्चेतील विषय बनल्याने, त्यासंदर्भातील बातम्यांचे संकलन अन् समाजामध्ये जागृती कशी करता येईल यासाठी लक्ष केंद्रीत केले होते. शिवाय लॉकडाऊनच्या काळात गरजूंना अन्नदान, धान्याचे किट, औषध आदी मदत (गोपनियता बाळगून तसेच फोटो न काढता)करत होतो. कार्यालयीन जबाबदारी तसेच मदतकार्य करताना स्वतःच्या सुरक्षेची काळजी सुध्दा घेत होतो.
यातच २४ एप्रिलला कार्यालयीन कामकाज संपवून घरी आल्यानंतर आईला अचानक ताप आणि अंगदुखीचा त्रास सुरू झाल्याचे वडिलांनी सांगितले. क्षणाचाही विलंब न करता रात्री १० वाजेच्या सुमारास आईला फॅमीली डॉक्टरांकडे घेऊन गेलो. हॉस्पीटलच्या बाजूलाच मामाचे घर आहे. ते एका मित्रासोबत बाहेर चर्चा करीत उभे होते. आम्हाला बघितल्यानंतर काय झाले म्हणत मामाही हॉस्पीटलमध्ये आले. डॉक्टरांनी आईची तपासणी करून माझ्याकडून कोरोनाच्या परिस्थितीचा धावता आढावा घेतला. बाहेर फिरत असल्याने विशेष खबरदारी घ्यायला सांगत दोन दिवसानंतर आईच्या प्रकृती संदर्भात कळविण्यास सांगितले. दोन दिवसानंतर आईच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नव्हती. फॅमिली डॉक्टरांऐवजी महापालिकेने उभारलेल्या ताप केंद्रामध्ये तपासणी करायला हवी, यासंदर्भात घरात चर्चा झाली. त्यानुसार वडील आईला घेऊन सिडको, एन-२, कम्युनिटी सेंटर येथे उभारलेल्या महापालिकेच्या ताप केंद्रामध्ये घेऊन गेले. सकाळचे ११ वाजून गेले होते. तिथे डॉक्टर आलेले नव्हते. वडिलांनी संबंधित डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतले. दुपारी १२ वाजेच्या सुमारास डॉक्टर आले अन् त्यांनी आईची तपासणी करून गोळ्या दिल्या. तपासणी कशा पध्दतीने केली याचा अनुभव वडीलांनी मी कार्यालयातून रात्री घरी आल्यानंतर सांगितला. सध्याचे वातावरणच तसे आहे, इग्नोर करा असं मी वडीलांना म्हणालो. त्यांनीही परिस्थिती लक्षात घेता चर्चा थांबवली. तेथील डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या संपल्यानंतरही आईची प्रकृतीत सुधारणा नव्हती. या काळामध्ये अन्य डॉक्टर मित्रांसोबता आईच्या प्रकृतीसंदर्भात चर्चा करून त्यांच्या सूचनेनुसार उपचार सुरूच ठेवला होता. प्रकृतीत सुधारणा नसल्याने २९ एप्रिलला डॉ. हेडगेवार रूग्णालयामागील मनपाच्या शाळेतील ताप केंद्रामध्ये आईला घेऊन गेलो. तेथे रूग्णांच्या रांगा लागलेल्या होत्या. दुपारचे १२ वाजलेले असतानाही तेथे डॉक्टर, नर्स आलेले नव्हते. ही माहिती मनपा आरोग्य अधिकाऱ्यांना दिली. सुमारे अर्धा तास तिथे थांबूनही कोणीच येत नसल्याने आईला घेऊन एन-२ येथील ताप केंद्रांमध्ये गेलो. तिथेही लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. डोकंदुखीचा त्रास जाणवत असल्याने आईसोबत मी सुध्दा डॉक्टरांकडून गोळ्या घेतल्या. दोन दिवसानंतर डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या संपूनही सुधारणा होण्याऐवजी आईची प्रकृती अधिकच बिघडत चालली होती. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शंका आल्याने मी डॉक्टरांना कोरोना तपासणीसंदर्भात चर्चाही केली. मात्र, त्यांनी गरज नसल्याचे सांगितले. यातच १ मे २०२० रोजी अचानक सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मला ताप आणि डोकंदुखीचा त्रास सुरू झाला. शंका बळावल्याने कार्यालयातील वरिष्ठांना कोरोना संदर्भातील तपासणी करत असल्याचे सांगितले. २ मे २०२० रोजी मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी कोरोना तपासणीसंदर्भात चर्चा केली. आणि डॉ. हेडगेवार रुग्णालयामागील महानगरपालिका शाळेतील ताप केंद्रांमध्ये आईसह तपासणीसाठी गेलो. तेथील डॉक्टरांनी माझ्या दैनंदिन कामकाजाबद्दल माहिती घेऊन स्वॅब तपासणी करण्याचा सल्ला दिला. यासंदर्भात काही वेळेपूर्वीच आरोग्य अधिकाऱ्यांशी फोनवर बोलणे झाल्याचे तेथील डॉक्टरांना मी सांगितले. त्यांनी लगेच स्वॅब तपासणी करण्यासंदर्भातील पत्र दिले. त्या दिवशी स्वॅब किट उपलब्ध नसल्याने दुसऱ्या दिवशी तपासणी करण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान, जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा केली. त्यांनी केव्हाही आल्यास स्वॅब घेऊ असे सांगितले. ३ मे २०२० रोजी सकाळी ९ वाजताच मनपाच्या अंगणवाडी सेविका घरी आल्या. तुम्ही कोरोना तपासणी संदर्भात पत्र घेतले होते, तपासणी केली का? अशी विचारणा त्यांनी केली. उपलब्ध नसलेले स्वॅब किट आणि अधिकाऱ्यांशी झालेली चर्चा सांगितल्यानंतर त्या दोघीही निघून गेल्या. दुपारी १२ वाजेच्या सुमारास जिल्हा रूग्णालयातील डॉक्टर मित्राचा तपासणीला येण्यासाठी फोन आला. तत्काळ आईला घेऊन जिल्हा रूग्णालयात कोरोना तपासणी (स्वॅब) देऊन आलो. यासंदर्भातील कल्पना काही मित्रांना दिलेलीच होती. रिपोर्ट काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.
--------
अन् सकाळी सात वाजताच कळले रिपोर्ट पॉझिटिव्ह

४ मे रोजी सकाळी ७ वाजताच मित्राने फोन करून मी आणि आई कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. लगेच जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांना फोन करून कल्पना दिली. त्यांनी आमचे नाव पॉझिटिव्ह यादीत आहे का? याची पडताळणी करून दोघांना अ‍ॅडमिट व्हायला सांगितले. लगेच दोघांचे कपडे घे, रूग्णालयात जायचंय असे आईला म्हणालो. माझी काय गडबड सुरू आहे, आईला समजेना. नंतर आम्ही दोघेही पॉझिटिव्ह असल्याचे सांगून घरामध्ये सॅनिटायझर फवारणी करण्याचे वडीलांना सांगितले. जिल्हा रूग्णालयातील परिचयातील नर्सला उपचारासाठी येत असल्याचे सांगितले. नेमकी त्या रूग्णालयातच होत्या. आम्ही रूग्णालयात जाईपर्यंत त्यांनी वॉर्डामध्ये उपचाराची तयारी करून ठेवली होती. नंतर त्यांच्या सहकार्यांना माझी ओळख करून दिली. सकाळी १० नंतर डॉक्टर वॉर्डामध्ये आल्या. मला बघताच आश्चर्याने म्हणाल्या, आपण दोन दिवसांपूर्वीच तर भेटलो होतो. आता घाबरू नका, काळजी करू नका असे म्हणत त्यांनी धिर दिला.
-----
मित्र, नातेवाईकांकडून विचारणा अन् सोशल मिडियावर अफवा

दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती काही वेळेतच मित्र, नातेवाईकांपर्यंत पोहचली. मला आणि आईला सकाळी ९ वाजेपासूनच फोन सुरू झाले. मित्र, सहकारी अडचण, मदत लागल्यास निसंकोचपणे सांग, असे म्हणत धिर देत होते. मित्र-बंधू शंकर आडसूळ यांनी शासकीय रूग्णालयात उपचार नको, खासगीत करूयात. खर्च कितीही लागला तरी चिंता करू नको. खर्चाचे मी बघून घेईल असे म्हणत सरकारी रूग्णालयात उपचार घेण्यास मला विरोध केला. मात्र, जिल्हा रूग्णालयातील सर्वच डॉक्टर ओळखीचे आहेत. त्यामुळे इथे काहीच अडचण नाही, असं सांगत दोघेही इथेच उपचार घेतो असे सांगून खासगी रूग्णालयात जाण्यास मी नकार दिला. याच काळात शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री. विक्रम काळे, बहिणीच्या सासूबाई सुशिला पिंपळे-नाईक, श्री. संजय तायडे पाटील, सीए श्री. रोहण आचलिया, प्राचार्य श्री. मनोज पाटील, श्री. प्रदिप विखे, पक्षिमित्र श्री. रमेश राऊत, अ‍ॅड. तथागत कांबळे, प्रा. देवराज दराडे, श्री. सागर मगरे, श्री. विशाल नाईक, श्रीनिवास मोतीयळे, श्री. निखिल पवार यांनी मदतीसंदर्भात विचारणा केली. (आणखी बरीच नावे आहेत, या सर्वांची नावे प्राथमिक स्वरूपात घेतलीय) याशिवाय कार्यालयातील श्री. अविनाश डूंबरे, श्री. भालचंद्र पिंपळवाडकर यांनी उपचार तसेच अडचणीसंदर्भात विचारणा केली. मात्र, मदतीची तुर्तास गरज नाही अडचण आल्यास नक्कीच सांगतो, असे मी सर्वांनाच सांगत होतो. सर्वांचेच प्रेम, आस्था पाहून कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे मी एकप्रकारे विसरूनच गेलो होतो. दिवसभर मित्रांबरोबरच नातेवाईकांचे फोन, व्हिडियो कॉलींग सुरू होते. आजी, आजोबा, मामा-मामी, बहिण, बहिणीचे सासू- सासरे यासह अन्य नातेवाईक चिंता व्यक्त करत रडत होते. याच दरम्यान, सकाळी १० वाजेच्या सुमारास आरोग्य विभागाचे कर्मचारी घरी पोहचले. आम्ही घरी नसल्याचे समजल्यानंतर फोनद्वारे संवाद साधत दोघांना उपचारासाठी नेण्यास आलोय, तुम्ही कुठे आहात अशी विचारणा केली. दोघेही सकाळीच रूग्णालयात दाखल झाल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी गल्लीमध्ये जंतुनाशक फवारणी केली. यातच सोशल मिडियावर अफवांनी कळस गाठला होता. परिसरातील एका ‘भक्त’ पुढाऱ्याने सोशल मिडियावर मॅसेज टाकून ते किती सतर्क आहेत, हे दाखवून दिले. दुसऱ्या दिवशी माझ्या संपर्कातील सर्वांची तपासणी होणार होती. अनेकांनी तपासणीसाठी भितीपोटी नकार दिला होता. भिती दूर केल्यानंतर त्यातील काहीजण तपासणीसाठी तयार झाले. यातच ‘भक्ता’ने माझ्या संपर्कातील सर्वच एमआयटीच्या हॉस्टेलमध्ये कॉर्रन्टाईन असल्याचा मॅसेज व्हायरल केला. मुळात, तपासणी करण्यासाठी जाणारे सर्वच पुंडलिकनगरमध्ये बसची वाट पाहत उभे होते. ‘भक्ता’चे सोशल मिडियावरील मॅसेज पाहून यातील अनेकजण आणखीन घाबरून गेले होते. पुढील चार ते पाच दिवस अफवाच अफवा हितचिंतक ‘भक्त’ पसरवत होते. एकाने तर आईची प्रकृती सिरियर असल्याचे अनेकांना सांगून टाकले होते. या अफवानंतर येत असलेल्या फोनमुळे मला अधिक मनस्ताप सहन करावा लागला. इतकेच नव्हे तर दोघांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर कॉरन्टाईन असतानाही मी बाहेर फिरतोय यासंदर्भातील तक्रार काही हितचिंतकांनी पोलिसांकडे केली होती. मी घरातच असल्याची खात्री पोलिसांनी केल्यानंतर तक्रारीकडे दुर्लक्ष केले.
-------
अन् तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह
५ मे २०२० रोजी सकाळी पुंडलिनगर येथील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजले. यात माझे वडील आणि दोन मित्र हमखास असतील अशी शंका होती. चौकशी केल्यानंतर पुंडलीकनगर गल्ली नंबर दोन मधील ते तिघे असल्याचे समजले. तर पुंडलिकनगरमधील माझ्या संपर्कातील मित्र, आरोग्य बिटातील पत्रकार तसेच कार्यालयातील सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आल्याचे कळताच मी सुटकेचा निःस्वास टाकला. पॉझिटिव्ह असलेल्या एकास मी ओळखत होतो. दोन जण संपर्क नसल्याने माझ्यासाठी अनोळखीच होते. हे तिघेही माझ्या संपर्कातील नसताना ते कसे पॉझिटिव्ह निघाले हेच समजले नाही. त्यानंतर या तिघांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी झाल्यानंतर दररोज तीन ते चार रूग्ण पुंडलिकनगरमध्ये पॉझिटिव्ह निघू लागले. बघता बघता आठवडाभरातच पुंडलिकनगरमध्ये कोरोनाबाधितांच्या आकड्याने पन्नाशी पार केली. एक-एक करून परिसरातील गल्ल्यांचा ताबा घेत पोलिसांनी नागरीकांना गल्ल्यांबाहेर जाण्यास मज्जाव केला. मी स्वताहून कोरोना तपासणी करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता, याची जाणीव मला होऊ लागली. पॉझिटिव्ह निघाल्यानंतर इतरांचीही तपासणी झाल्याने वेळीच कोरोनाचा उपचार सर्वांना घेता आला याचा आनंदही होता. अफवा पसरविणाऱ्या ‘भक्तांनी’ मात्र माझ्यामुळेच या सर्वांना कोरोना झाल्याचे जगजाहीर करूनही टाकले होते. उपचार घेत असताना असे मॅसेज वाचून माझे मनोरंजनही व्हायचे अन् भक्त लोकांमध्ये करत असलेल्या खोट्या जागृतीबद्दल चिडही येत होती.
---------
अफवा पसरविणाऱ्यांचा मामांनाही त्रास

कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या ७ ते ८ दिवस अगोदर मी कोणाच्या संपर्कात होतो, याची माहिती आरोग्य विभाग, पोलिसांनी माझ्याकडून घेतली होती. २८ एप्रिल पासून सुट्टीवर असल्याने मी फारसा कोणाच्या संपर्कातही नव्हतो. तरीही जे संपर्कात आले त्यांची यादी दिली. यातील काहींनी तपासणी होईल या भितीपोटी आम्ही संपर्कात नव्हतो, असे सांगितले. अनेकांनी माझे नाव देऊ नकोस म्हणून फोनही केले. मनस्ताप वाढत असल्याने शेवटी तुमचा निर्णय तुम्हीच घ्या, असे म्हणत पुढील संवाद टाळत गेलो. यातच माझे दररोज मामाच्या घरी येणे-जाणे असते. तरीही मी त्यांचे नाव तपासणीसाठी दिले नाही. अशी अफवा ते राहत असलेल्या परिसरातील एका ‘भक्ताने’ पसरवली. मुळात, २४ एप्रिलला खासगी हॉस्पीटलमध्ये मामाची झालेली भेट ही आम्हा दोघांची शेवटची भेट होती. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मामाने आईला घरात येण्याचा फोर्स केला होता. घरातील सदस्यांना संसर्क होऊ नये म्हणून आई आणि मी घरात न जाण्याचा निर्णय घेऊन बाहेरच्या बाहेर निघून गेलो होतो. असे असतानाही मामाला ‘टार्गेट’ करण्याहेतू ‘भक्ताने’ त्यांच्यापासून दूर राहण्यासंदर्भात लोकांना सांगितले. कोरोना पॉझिटिव्ह भाच्यासोबत तुम्ही फिरत होते, घरात संचार असायचा हे खरं आहे का? यासंदर्भात विचारणा करणारे फोन मामाला येत होते. लोकांच्या अफवांचा त्यांनाही मनस्ताप सहन करावा लागला. त्यांच्या परिसरात अफवा पसरविणारा ‘भक्त’ कोण? याचा शोध घेतल्यानंतर मामा सोबत नेहमी राहणारा त्यांचाच मित्र निघाल्याने त्यांनाही आश्चर्य वाटले.
-----
त्याला कोणी सांगितले होतं फिरायला

कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर अनेकांनी मला ट्रोल करण्याची संधी सोडली नाही. जिल्हा रूग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेने उपचारादरम्यान मुलीला जन्म दिला होता. त्या दोघांनाही डिस्चार्ज देतानांचा सोहळा जिल्हा रूग्णालयात पार पडला होता. वार्ताकन करताना लहान बाळासमवेत फोटो काढून मी सोशल मिडियावर टाकले होते. अनवधानाने या सोहळ्याच्या चार दिवसानंतरच मी कोरोनाग्रस्त झालो. या फोटोंचा आधार घेत अनेकांनी मला ट्रोल केले. लहान मुलीला हातात घेतल्यानेच याला कोरोना झाला, त्याला कोणी सांगितले होते तिथे फिरायला अशा चर्चाही रंगल्या. अनेकांनी मुलीला घेतल्यामुळे कोरोना झाला का? असे फोनवर विचारले. वास्तविकता नेमकी कसं घडत गेले हे सविस्तरपणे सांगितलेलच आहे. नेमकी कोरोना कसा झाला याचे उत्तर माझ्याकडे आहे ना डॉक्टरांकडे. कोरोना हा आजार नसुन तो व्हायरस आहे. तो कसा आपल्याला जवळ करेल हे सांगता येत नाही. मी स्वतः दक्षता बाळगूनही कोरोना पॉझिटिव्ह झालो होतो. भविष्यात तो कोणाला होईल याची शाश्वती नसल्याने लोकांनी न घाबरता, अफवा न पसरविता या संकटाला सामोरे जायला हवे.

(तुर्तास भाग- १ इथेच थांबवितो. अनावधानाने कोणाचे नाव विसरले असेल तर क्षमस्व. ‘भक्तां’ची नावे त्यांची बदनामी नको म्हणून टाळलीत.)