Friday, September 3, 2021

नाभिक समाजाच्या प्रगतीला हवीय संघटनात्मक कृतीची जोड

  नाभिक समाजातील एक ज्वलंत दीप तेवत ठेवणारे थोर समाज सुधारक राष्ट्रसंत श्री सेना महाराज यांनी उभ आयुष्य नाभिक समाजासाठी अर्पण करून त्यांनी अभंगवाणीतून समाजात परिवर्तनाची ज्योत निर्माण केली. तत्कालीन वर्णभेद, बालविवाह, सतीप्रथा आदी वाईट चालीरीतीच्या कुप्रथेतून मानवी जीवनाला भयमुक्त करून मानवी जीवनाला स्वतंत्र जीवन जगण्यासाठी त्यांनी प्रेरणा दिली. संत सेना महाराजांनी अंधश्रध्देत गुरफटलेल्या समाजाला प्रयत्नवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने समाजबांधव एकत्र येऊन धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत आलाय. हे करत असतानाच आता विचारांची देवाणघेवाण, आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल चर्चा, व्यवसायातील पुढील आव्हाने आदी बाबींवरही विचारमंथन होण्याची गरज निर्माण झाली आहे. दहा ते पंधरा वर्षांपासून समाजाला वरदान लाभलेल्या कलेवर परप्रांतिय, धनधांडग्यांनी अतिक्रमणे करण्यास सुरूवात केली. कार्पोरेट कंपन्या सलून व्यवसायात उतरल्या. केश कापण्याबरोबरच दाढी करणे म्हणजे केशकर्तन नव्हे याही पलिकडे जाऊन या व्यवसायाला अधिक व्यापक कसे करता येते, हे कार्पोरेट कंपन्यांनी दाखवून दिले. मुलांमुलींतील वाढत्या सौंदर्याच्या कल्पनांमुळे हा व्यवसाय अधिकच व्यापक झाला. केशकर्तनाचा ‘व्यवसाय’ करून सौंदर्य प्रसाधने उत्पादन कंपन्यांनी आणि केशकर्तनाच्या कार्पोरेट कंपन्यांनी फ्रेंचाइजी देण्यास सुरूवात केली. केशकर्तनाचेच काम अत्यंत सुबक आणि व्यावसायिक पध्दतीने कसे करावे याचे तंत्र त्यांनी अंमलात आणले. नाभिक समाजाच्या पारंपारिक व्यवसायाला ग्लोबल टच आणि कार्पोरेट लूक देऊन शिवाय देणाऱ्या सेवांचे ‘मोल’ कसे घेता येऊ शकते, याची समाज बांधवाला शिकवण दिली. हेअर कट, फेशियल, मसाज, हेड मसाज, हेअर डाय, ब्लिचिंग इतकेच नव्हे तर नखेदेखील वेगळ्या पध्दतीने कापून त्याचेदेखील सौंदर्य वाढविता येते. चेहऱ्यावरील व्रण घालविण्यासाठीच्या थेरपीची कामे हायटेक सलुनच्या माध्यमातून करण्यात येते हे दाखवून दिले. आधुनिकतेची कास धरत समाजाच्या व्यवसायावर नाभिक समाजेत्तर लोकांनी कब्जा मिळविण्याने हाताच्या कारागिरांवर उपाशी मरण्याची नामुष्की ओढवली. शहरी भागात समाजबांधव पारंपारिक दुकानांना ‘सलुन्स’चे लूक देत आहेत. रंगसंगती, आरामदायी खुर्च्या, अत्याधुनिक साधन-सामुग्रीचा वापर करून इतरांप्रमाणे ‘हायटेक’ होत आहेत. परंतु, ग्रामीण भागातील कारागिर हा अत्याधुनिक ज्ञानापासून अजूनही कोसोदूर आहे. कार्पोरेट कंपन्यांनी शहरी भागात जसा शिरकाव केला तसाच ग्रामीण भागात शिरकाव केल्यास ग्रामीण भागातील कारागिरांना भविष्यात उपासमारीचाच सामना करावा लागणार आहे. कारण ग्रामीण भागात सुमारे ६० ते ७० टक्के समाज आपल्या पारंपारिक सलून व्यवसायात कार्यरत आहे. आधुनिकतेची कास धरूनच त्यांना भविष्यात पारंपारिक व्यवसाय टिकविणे शक्य होणार आहे. शहरी भागातील तज्ज्ञ बांधवांनी ग्रामीण भागातील कारागिरांना अत्याधुनिकतेचे प्रशिक्षण देऊन ‘तज्ज्ञ’ करणे काळाची गरज बनली आहे. सामुहिक चिंतनाची गरज कोरोना विषाणुने संपूर्ण जगामध्ये अक्षरश: धुमाकुळ घातला. लॉकडाऊन घोषित झाल्यापासून आपले राष्ट्रीय व नैतिक कर्तव्य समजून सलून व्यावसायिकांनी आपला नियमित खर्च, दुकान भाडे, वीजबिल, कर्ज देणी याची पर्वा न करता आपापली दुकाने बंद ठेऊन राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविला. सलून व्यवसाय हेच एकमेव उत्पन्नाचे साधन असलेल्यांवर लॉकडाऊनच्या काळात उपासमारीची वेळ आली. उत्पन्न घटल्याने समाज बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण होते. तरीही वैयक्तिक संकटांपेक्षा राष्ट्रीय संकटाशी झुंज देणे समाजबांधवांनी आपले आद्य कर्तव्य मानले. तरीसुध्दा समाज माध्यमावरून टिका आणि टिंगल टवाळकी नाभिकांचीच झाली. कोरोना विषाणूच्या संसर्गाकरिता सलून व्यावसायिक जवाबदार असल्याचा जावईशोध अनेकांनी लावला. असे असले तरीही लॉकडाऊनच्या काळात सलून दुकाने बंद असल्याने केस-दाढी वाढल्यानंतर समाजाची अनेकांना आठवण नक्कीच झाली. डोक्यावरील वाढलेले केस, दाढी या समस्येवर पर्याय शोधत अनेकांनी घरच्या घरी कटींग, दाढी करण्याची मोहिम हाती घेतली. अत्याधुनिक मशिनरीचा वापर करून ‘टक्कल’ केले. बायका, पोरांची ‘कलाकारी’चर्चेत येण्यासाठी सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल केल्या. टिंगल-टवाळकीच्या भावनेतून तयार झालेल्या अशा पोस्टला समाजबांधवांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. वाढते शहरीकरण, लोकांच्या गरजा लक्षात घेऊन बलुतेदारी पध्दतीत बदल करून उन्नतीसाठी ‘दुकानदारी’ करायला हवी. कोरोनानंतर सलून व्यवसायामध्ये सकारात्मक बदल झाले आहे. कोरोनामुळे प्रत्येक व्यक्ती आरोग्याविषयी जागृत होऊन पैशांपेक्षा आपला जीव, आरोग्य महत्वाचे समजू लागला आहे. हीच बाब हेरून ग्राहकांच्या आरोग्यविषयक दृष्टिकोनातूनही समाज बांधवाला बदल करणे आवश्यक आहे. हे कार्य कोणा एकाचे नसून याकरीता सामूहिक समन्वय आणि कृतीची गरज आहे. आपल्या जवळ उपलब्ध असलेल्या साधनांचा संघटनांमध्ये सुरू असलेले वाद उफाळून काढणे, एकमेकांवर टिका टिपण्णी करण्यापेक्षा व्यावसाय वृध्दीच्या अनुषंगाने एकमेकांशी संवाद स्थापित करून व्यवसायाची दिशा निश्चित करण्याची गरज आहे. समाजातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच कार्यकर्त्यांनी समन्वयाची भूमिका बजावून आपल्या भागाची गरज, जीवन शैली आदींचा अभ्यास करून व्यावसायिक पध्दती, प्रक्रियेचा आराखडा तयार करायला हवा. श्री संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीदिनी सकारात्मकतेची कास धरण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केल्यास नक्कीच वैक्तिगत अन् समाजाची प्रगती साधली जाऊ शकते. तुषार विष्णू वखरे (औरंगाबाद) मो-९८८११७७९३३