Sunday, June 7, 2020

कोरोना स्टॉप करोना - भाग ४ ,

भाग एक ते तीनमध्ये घडलेल्या घटना आपण नक्कीच वाचल्याच असतील. यात माझा हॉस्पीटलपर्यंतचा प्रवास, अफवांनंतर घडलेल्या घटना, जिल्हा रूग्णालयातील कारभार, रूग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांवर अधिकाऱ्यांची ‘सुंदर’पध्दतीने हाताळणी, नर्सेस आणि सफाई कर्मचाऱ्यांचा समजूतदारपणा मांडला. तसाच येथे दाखल होणाऱ्या रूग्णांचे कारनामेही समोर यायला हवेत. असेच काही कारनामे, किस्से, धावपळ मी डोळ्यासमक्ष पाहिलेल्या रूग्णांबद्दल. (भाग-४)


दोन दिवसांचा उपचार घेतल्यानंतर वॉर्डामध्ये बाहेर ठेवलेल्या जारमधून पाणी आणण्यासाठी जाताना एक-एक रूग्णांची ओळख होत गेली. नुर कॉलनीत राहणाऱ्या ६७ वर्षीय ‘बाजी’ची सर्वप्रथम ओळख झाली होती. १३ मे २०२० रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यांच्यासह वॉर्डातील अन्य तीन रूग्णांनाही सुट्टी मिळाली. ‘बाजी’ जोपर्यंत वार्डामध्ये होत्या, तोपर्यंत मला कोणत्याही प्रकारची चिंता नव्हती. सकाळी नाश्ता, दुपार अन् रात्रीचे जेवण आल्यानंतर त्याच मला आवाज द्यायच्या. मी झोपलेलो असलो तरी त्या पुन्हा पुन्हा आवाज देऊन उठवायच्या. घरच्या सदस्यांप्रमाणेच त्यांनी काळजी घेतली. त्यांना डिस्चार्ज देताना त्यांचे स्वागत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. हा सोहळा संपल्यानंतर अधिकारी कार्यालयात निघून गेले. परंतु, त्या दिवशी ज्यांना ज्यांना डिस्चार्ज मिळाला त्यांना प्रशासनाच्या गलथान कारभाराबद्दल मनस्ताप झाला. त्यांना घरापर्यंत पोहचविण्यासाठी अ‍ॅम्बुलन्सची सुविधा विलंबाने करण्यात आली. सुमारे दोन तास डिस्चार्ज झालेले रूग्ण जिल्हा रूग्णालयाच्या पायरीवर बसून अ‍ॅम्बुलन्सच्या प्रतिक्षेत होते. वॉर्डातील अन्य रूग्णांना त्यातील एकाने कल्पना दिली. त्यांनी मला हा प्रकार सांगितल्यानंतर अधिकाऱ्यांना यासंदर्भात बोललो. त्यांनी तत्काळ त्या रूग्णांना घरापर्यंत पोहचविण्यासाठी व्यवस्था केली.
----
अन् एक-एक रूग्ण भेटत गेले
वॉर्डातील रूग्णांना एक-एक करून डिस्चार्ज मिळाल्याने अन् रूग्ण उपचारासाठी दाखल होत होते. १५ मे रोजी रात्रीच्या दरम्यान तीन नवीन रूग्ण वॉर्डात दाखल झाले. सेवानिवृत्त अधिकारी त्यांच्या पत्नी आणि मुलासह कोरोनाबाधित झाले होते. सेवानिवृत्तीनंतर ते एका शासकीय कार्यालयात काम करत असल्याचे त्यांनी ओळखीदरम्यान सांगितले. १६ मे रोजी सकाळी ८ च्या सुमारास ते नर्सेसशी संवाद साधत होते. त्यांना स्वतंत्र रूम, एसी नसेल तर कुलर, पिण्यासाठी थंड पाणी, सेपरेट टॉयलेट-बाथरूम असावे अशी फरमाईश ते नर्सकडे करत होते. त्यांच्या या मागण्यापाहून नर्सेस बरोबरच मीही अवाक झालो. ११ वाजून गेले तरीही त्यांची 'फर्माईश' पूर्ण होत नसल्याने त्यांनी ‘ओळख’ दाखवायला सुरूवात केली. त्यांनी कुठं-कुठं काम केलंय, त्यांच्या ओळखी कुठपर्यंत आहे याची कथा नर्सेसला सांगू लागले. कोणत्याही मागण्या मान्य होऊ शकत नाही, असे स्पष्टपणे नर्सेसने सांगितल्यानंतर त्यांनी ‘ओळखी’चा वापर करण्यास सुरूवात केली. ‘ओळखी’च्या संपर्कानंतर अधिकाऱ्यांपर्यंत त्यांच्या समस्याही पोहचल्या. त्यानंतर माझ्या समोरील, बाजूची अन् तिसरी थोडी लांब याप्रकारे तिघांनाही स्वतंत्र रूम देण्यात आली. इतके करूनही त्यांचे समाधान झालेले नव्हते. दुपारी १ वाजेच्या सुमारास जेवण आल्यानंतर त्यांनी जेवण देणाऱ्यांसोबतच वाद घातला. भात नको, पोळ्या जास्त द्या, थंड पाण्याची व्यवस्था करून द्या अशी मागणी करू लागले. जेवण आणून देणारा त्यांच्याकडे बघतच राहिला. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास चहा घेताना त्यांना कागदाच्या कपात नव्हे तर ग्लासमध्ये तो हवा होता. त्यांचा स्वभाव जेवण-चहा आणून देणाऱ्याच्या लगेच लक्षात आला. रात्रीचे जेवण देताना या तिघांना पहिले वाटप करण्यात आले. त्यांना भात नको तर पोळ्या असं फर्माइशनुसार देण्यात आले. तरीही या रूग्णाचे मन काही भरले नाही. दुसऱ्या दिवशी जेवणाचा दर्जा खराब असल्याबद्दल त्यांनी वाद घातला. त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने शेवटी या रूग्णाने घरी उपचार घेतो. मला डिस्चार्ज द्या, असा तगादाच प्रशासनाकडे सुरू केला. त्यांच्या मागण्या वाढतच असल्याने एका महिला डॉक्टरने त्यांना चांगलेच सुनावले होते. त्यानंतर नर्सेस, जेवण देणाऱ्यांच्या तक्रारी करण्यात येईल, अशी धमकी ते देत गेले. रूग्णाच्या अशा वर्तवणुकीला, वारंवार होणाऱ्या मागण्याला कंटाळून पाचच दिवसांमध्ये अर्थात २० मे २०२० रोजी प्रशासनाने त्यांना डिस्चार्ज दिला. मुळात रुग्णाला अपूर्ण उपचारविना सोडणे कितपत योग्य होते, हे समजू शकले नाही. दरम्यान, या रूग्णांनंतर मात्र वार्डातील वातावरणही बिघडून गेले. अन्य रूग्णही सोईनुसार उपचार होण्यासाठी त्यांची ‘ओळख’ कुठपर्यंत आहे हे दाखवत होता. एकाने तर आरोग्य मंत्र्यांच्या पी.ए. मार्फत अधिकाऱ्याकडून सोय करून घेतली. २० मे रोजीच मलाही डिस्चार्ज मिळाल्याने पुढे काय झाले हे तेथील कर्मचारीच जाणो.
----------
दोन रूग्ण, नातेवाईकांची दैना बघवेना....

जिल्हा रूग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रूग्णांची प्रकृती १४ मे रोजी अचानक बिघडली होती. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (घाटी) हलविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. घाटी प्रशासनाशी जिल्हा रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी फोनवर संपर्क साधला. ऐनवेळी घाटी प्रशासनाने नकार दिल्याने या रूग्णावर जिल्हा रूग्णालयातच उपचार करण्याची नामुष्की ओढवली. रूग्णांचा जीव वाचविण्यासाठी जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. रात्रभर केलेल्या उपचारानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. तर १८ मे रोजी एका सिरियस रूग्णांच्या पत्नीची दैना डोळ्यासमक्ष बघितली. माझ्या वॉर्डासमोरील वॉर्डात हिमायत नगर, हिमायत बाग येथील दोघा पती-पत्नीवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होता. सायंकाळी सात वाजेनंतर या रूग्णास श्वास घेण्यास त्रास झाला. याची कल्पना डॉक्टरांनी त्यांच्या पत्नीला दिली होती. शिवाय जवळच्या नातेवाईकास रूग्णालयात येण्यास बोलवा, असेही कळविले होते. उपचार घेणारी त्यांची पत्नीही वृध्द असल्याने काय करावे, कुठे जावे, कोणाला सांगावे अशी स्थिती त्यांच्यासमोर होती. जवळ मोबाईल असताना त्यांना अज्ञानामुळे स्मार्टफोन हाताळता येत नव्हता. डॉक्टरांसह इतर कर्मचारी त्यांच्या पतीच्या उपचारासाठी धावपळ करत होते. आजूबाजूच्या रूग्णांना नंबर लावून द्या अशी विनवणी त्या करत होत्या. मात्र, अन्य रूग्णांनी त्यांना दाद दिली नाही. माझ्या रूमचा दरवाजा त्यांनी वाजवला अन् फोन लावून देण्याची विनंती केली. त्याच दिवशी दुपारच्या वेळेस त्या माझ्याकडे आल्या होत्या. माझ्या पतीला साध्या टॉयलेटमध्ये बसता येत नाही. त्यांना त्रास होतोय ‘कमोट’ टॉयलेट कुठे उपलब्ध होईल हे सांगता येईल का? हे विचारण्यासाठी त्या आल्या होत्या. नर्सेसच्या कॅबीनमध्ये विचारणा केल्यास त्या सांगतील असे सांगून त्यांच्याकडे पाठवुन दिले होते. आता फोन लावून द्या, म्हणत असल्याने मीही गडबडलो होतो. नेमकी काय झाले? हे विचारल्यानंतर त्यांनी प्रकार सांगितला. त्या जे नाव सांगत होत्या, ते मी टाईप करण्याचा प्रयत्न करायचो. परंतु, नाव सेव्ह करताना स्पेलींग मिस्टेकमुळे त्या सांगत असलेले नाव शोधूनही सापडत नव्हते. अखेर फोन लिस्टमधील एक-एक नाव वाचून दाखविल्यानंतर त्यांना हवे असलेल्यांचा नंबर मिळाला. पतीच्या प्रकृतीबद्दल कल्पना देऊन सुमारे दोन तास होऊनही नातेवाईक तिथे आलेले नव्हते. दोन तासानंतर त्या पुन्हा माझ्याकडे नंबर लावून द्या, असे म्हणत आल्या. दुसऱ्यांदा फोन झाल्यानंतर नातेवाईक तासाभरामध्ये रूग्णालयात पोहचले होते. तोपर्यंत या दोघांनाही घाटी रूग्णालयात हलविले होते. दुसऱ्या दिवशी माझ्याकडे पॉझिटिव्ह रूग्णांचा वाढलेला आकडा आणि झालेल्या मृत्यूची लिस्ट आली. यात रात्रीच्या रूग्णाचा मृत्यू झाल्याचे समजताच त्या वृध्द पत्नीची दैना माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली होती. त्या दिवशी दुपारपर्यंत मला करमले नव्हते. (क्रमशः)

1 comment: