जिल्हा रूग्णालयातील डिस्चार्ज सोहळ्यानंतर घरी जाण्यासाठी बसची वाट पहावी लागली. पंधरा मिनिटांच्या प्रतिक्षेनंतर सिटी बस आली. अन्य रूग्णांचाही यात समावेश असल्याने खचाखच भरलेल्या बसमध्ये सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडालेला होता. पुंंडलिकनगर गल्ली नंबर एकसमोर दोघांना सोडण्यात आले. गल्लीमध्ये जाण्यासाठीचा रस्ता पत्र्यांनी पूर्णपणे बंद केलेला होता. आम्ही जाताच बाजूला बसलेले पोलिस कर्मचारी आले. तुम्ही डिस्चार्ज झालेले रूग्ण आहेत का? अशी विचारणा केल्यानंतर नाव, मोबाईल क्रमांक, आमचे फोटो काढले. आम्ही बाजूला असलेल्या जागेतून गल्लीमध्ये प्रवेश केला. मित्रांसह गल्लीतील रहिवासी स्वागतासाठी उभेच होते. घराजवळ जाताच गाणे वाजवून, फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. त्यांच्याशी बोलण्याचा मोह टाळून मी सरळ घरामध्ये गेलो.
----
गल्लीमध्ये एकप्रकारे कर्फ्यूच
गल्लीमध्ये आमच्या दोघांसह अन्य दोन जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते. अन्य दोघे आमच्या अगोदरच उपचार घेऊन ठणठणीत घरी परतलेले होते. डिस्चार्ज नंतरही मी पॉझिटिव्ह असल्याने गल्लीतील सर्वजण घाबरलेले होते. इतरांना त्रास नको म्हणून घराबाहेर न निघण्याचे ठरवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी लॉकडाऊन शिथिल झाल्याने वडील भाजीपाला आणण्यासाठी बाहेर गेले. १७ दिवसांपासून घरात जे होते तेच बनवून वडील खात होते. आम्ही आल्याने त्यांना बाहेर पडायला मिळाले. भाजीपाला घेऊन ते गल्लीत येताना त्यांना पोलिसांनी अडविले. त्यांच्या जवळील दुचाकी पोलीस सोडत नव्हते. त्यांनी घरी येऊन हा प्रकार सांगितला. मी स्वतः बाहेर जावून गाडी घेऊन आलो. यासाठी पुंडलिकनगर पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांशी चर्चाही करावी लागली. बस्स हा प्रसंग वगळता पुढील १४ दिवस घराबाहेर पडलेलो नव्हतो. नेहमी किलबिलाट असणाऱ्या गल्लीमध्ये पॉझिटिव्ह रूग्ण निघाल्यानंतर एकप्रकारे कर्फ्यूसारखे वातावरण तयार झालेले होते. (अनेकांची मने दुखावेल या हेतूने खऱ्या परिस्थितीचे वर्णन करणे टाळत आहे.)
----
वडील बनले होते ‘आत्मनिर्भर’
आमच्या रूग्णालयातील पहिल्या दिवसांपासून डिस्चार्ज होईपर्यंत वडीलांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. स्वताच्या हाताने जेवण बनवून खाणे, बाहेर न निघणे, कोणाशी संवाद न साधणे इतकेच काय बहिष्कार टाकलेल्या व्यक्तींप्रमाणेच त्यांना रहावे लागले. कधी स्वताच्या हाताने पाणी न घेणाऱ्या वडीलांवर स्वता जेवण बनविण्याची वेळ आली होती. स्वयंपाक कसे बनवायचे याचे धडे ‘व्हिडीयो कॉलींग’द्वारे आईकडून त्यांना मिळत होते. १७ दिवसांमध्ये आत्मनिर्भरतेने ते पूर्णपणे ‘स्वयंपाकी’ बनले होते. २० मे २०२० आम्ही डिस्चार्जनंतर घरी येण्यापासून हे लिहिपर्यंत अर्थात १० जूनपर्यंत त्यांनी स्वता आमच्यासाठी स्वयंपाक बनविला आहे. अजूनही त्यांची ही मोहिम सुरूच आहे. याकाळात त्यांनी दररोज आमच्या प्रकृतीबद्दल माहिती जाणून घेत होणारा त्रास-सुधारणा हे डायरीमध्ये लिहून ठेवलय. दररोज येणाऱ्या फोनची नोंदसुध्दा त्यांनी डायरीमध्ये करून ठेवली आहे. ते दररोज नोंद करत असलेली डायरी माझ्या हाती लागल्याने डायरीचे गुपीत मला कळले. आम्ही केवळ कोरोनाग्रस्त होतो. परंतु, ते आमच्यापेक्षाही जास्त दुखाने ग्रस्त होते. त्यांना होणारे दुख ते कोणाला सांगू शकत नसले तरी माझ्या निदर्शनास येत होते.
--------
पुन्हा मला अॅडमिट होण्यासाठी फोन
घरी येऊन एक दिवस उलटत नाही तोच तुमचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याने अॅडमिट व्हावे लागेल, असा फोन आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला. मग डिस्चार्ज का दिला? असा प्रश्न मी उपस्थित केला. आम्हाला काही माहित नाही, अॅम्बुलन्स येईपर्यंत तुम्ही तयारी करा असे समोरील व्यक्तीने सांगितले. पत्रकार मित्र आणि कार्यालयातील वरिष्ठांना हा प्रकार सांगितला. काही मिनिटांमध्येच मनपा आरोग्य अधिकाऱ्यांनी माझ्याशी संवाद साधला. नेमकी कोणाचा फोन आलता?, तुम्हाला काही त्रास आहे का?, अशी विचारणा करत आता अॅडमीट होण्याची गरज नाही. तुमच्यापासून कोणाला धोका नाही अन् कोणापासून तुम्हालाही धोका नाही असे म्हणत आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत काही औषध पाठवत असल्याचे सांगून काही त्रास असेल तर सायंकाळी पुन्हा कळवा असे त्या म्हणाल्या. त्यावेळी माझी प्रकृती चांगली होती. फक्त खोकला अन घस्यात थोडा त्रास होता. याची कल्पना मी त्यांना दिली. ( सायंकाळी मात्र त्यांना फोन करून प्रकृती बद्दल माहिती देण्यास मी विसरलो) आरोग्य अधिकाऱ्यांच्या फोननंतर पंधरा मिनिटानंतर लगेचच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी औषधी आणून दिल्या. घडलेला प्रकाराचे वृत्त दैनिकांमध्ये प्रकाशित झाले. नागरीकांनी हे वृत्त छापण्यामागील हेतू लक्षात न घेता वेगळीच चर्चा सुरू केली. पॉझिटिव्ह रूग्णावर घरात उपचार सुरू आहे, अशी चर्चा, अफवा सोशल मिडियाच्या माध्यमातून पसरविण्यात आली. या प्रकारानंतर अधिकच मनस्ताप झाला.
----------
मनाला कोरोना होऊ देऊ नका
ताप, अंगदुखी, अशक्तपणा, श्वास घेण्याचा त्रास, पोट खराब होणे, डोकेदुखी आदी सर्वसाधारण लक्षणे कोरोनाची आहे. लक्षणे जाणवू लागले की डॉक्टरांचा सल्ला, तपासणी करून घेणे हाच कोरोनाला वेळीच रोखण्याचा उपाय आहे. नेमकी काय त्रास होतोय, हे डॉक्टरांना न घाबरता मनमोकळ्यापणाने सांगायला हवे. अनावधानाने कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर कोणत्याही प्रकारचे दडपण घ्यायला नको. मधुमेह, श्वसन, किडणी, ह्दयरोग आदी समस्या तसेच वय जास्त असेल तर जास्तीची काळजी घ्यायला पाहिजे. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनेनुसार गोळ्या घ्यायला पाहिजे. चांगल्या गोष्टींमध्ये मन रमवायला पाहिजे. कोरोना व्हायरसची लक्षणे ही केवळ शरीरापर्यंत मर्यादीत असते. कोरोना मनापर्यंत पोहचला तर सर्वकाही संपल्याची भावना निर्माण होते. त्यामुळे मनाला कधी कोरोना होऊ देऊ नका, असे आतापर्यंतच्या व्यक्तिगत अनुभवावरून वाटते.
--------
नकळतपणे पसरतो आजार
कोरोना कसा होतो, यासंदर्भात कोणीही स्पष्टपणे सांगू शकत नाही. मी पत्रकारितेच्या निमित्ताने बाहेर वावरताना सर्व प्रकारची काळजी घेत होतो. सॅनिटायझर, मास्क यासह वेळोवेळी हात धुणे हा प्रकार करतच होतो. सर्व नियमांचे पालन करूनही कळत न कळतपणे कोरोना घरापर्यंत येऊन पोहचला. कोरोना संसर्गजन्य असल्याने तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत सहज पोहचतो. प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेनुसार त्याची लक्षणे इतर पॉझिटिव्ह रुग्णांमार्फत इतरांपर्यंत पोहचू शकतात. याशिवाय खोकला, शिंकणे तसेच थुंकल्याने या आजाराच्या विषाणूंचा प्रसार होतो. त्या विषाणूच्या संपर्कात असलेल्या वस्तू, व्यक्ती किंवा पदार्थांवर ते विषाणू जावून बसतात. हवेद्वारे कोरोना विषाणू पसरत असल्याने परिसरातील व्यक्तींना नाक, तोंडावाटे कोरोणाचा बाधा होऊ शकतो.
आगामी काळामध्ये कोरोनासोबतच सर्वांना जगायचं आहे ही मानसिकता आतापासूनच बनवून घ्यायला पाहिजे. उन्हाळ्यानंतर आता पावसाळा आणि नंतर हिवाळा या ऋतूत साथीचे आजार होणारच आहे. यातच कोरोनाचा फैलाव होऊन कोरोनाग्रस्तांच्या आकड्यांमध्येही प्रचंड वाढ होणार आहे. इतर सर्वांनाच कोरोना पसरवणारे संभाव्य शरीर म्हणून सर्वांना बघावे लागणार आहे. हा विचार करूनच सर्वांनी सावधानता बाळगुनच कामकाज करणे गरजेचे आहे. हे करताना माणसात अंतर असावे माणुसकीत नव्हे.
कोरोना भितीचा विस्तार वाढवण्यापासून रोखण्यासाठी आपल्या मनातली संवेदना जिवंत ठेवणे गरजेचे आहे. हीच संवेदना आपल्या भीतीला आपलाच शत्रू होण्यापासून रोखू शकणार आहे. कोरोनामुळे लोकांमध्ये इतका स्वार्थ आणि जगण्याचा मोह निर्माण झाला की जगण्यासाठी इतरांशी अमानुषपणे वागायलाही माणूस मागे-पुढे बघत नाहीये. समाज आणि परंपरेतील मूल्य या कोरोनाने नष्ट केलीय. या मूल्यांबरोबरच संवेदना, संवाद, आपुलकी, सहकार्य यासारख्या भावना कोमजल्या आहेत. आज असलेला कोरोना भविष्यामध्ये नष्ट होणारच आहे. यास विलंब लागेल मात्र कोरोनासोबत जगण्याची सर्वांनी दर्शविली पाहिजे. संवेदना, संवाद, आपुलकी या कोमेजलेल्या भावनांना नवचेतना प्रदान करणे गरजेचे आहे. भीतीने भयभीत न होता या आजाराला सामोरे गेलेल्यांना धीर देण्याचे काम आगामी काळात झाल्यास नक्कीच कोरोनाशी दोन हात करण्यास सर्वजण यशस्वी होतील. माझा उपचारानंतरचा कॉरन्टाईन पिरियड संपलेला असला तरीही अजून घरामध्येच आहे. लवकरच फिल्डवर येणार असल्याने आपल्याशी नक्कीच संवाद, भेट होईल. (आतापर्यंतचे सर्व अनुभव लिहिताना कोणाचे मन दुखावण्याचा हेतू मुळीच नव्हता. किंवा जाणूनबुजून कोणाला टार्गेटही करण्यात आलेले नाही. जे घडलय तेच मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोरोनाने इतरांना स्वार्थी बनविलेले असले तरीही मी जसा होतो तसाच आगामी काळात राहणार आहे. इतकेच नव्हे तर त्यापेक्षा अधिक इतरांच्या मदतीसाठी कसा येईल यासाठी प्रयत्नशील असेल. यासाठी आपल्या सर्वांची मदत, सहकार्य नक्कीच लागणार आहे.) {समाप्त}





