Wednesday, May 21, 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नवदृष्टीकोन: शिस्त, गुणवत्ता आणि पारदर्शकतेचा आदर्श

माझं मत - बोल धडक...{पोस्ट क्रमांक -१} दिनांक १९ मे २०२५ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अलीकडे घेतलेल्या निर्णायक निर्णयांमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात एक सकारात्मक हलकल्लोळ निर्माण झाला आहे. परीक्षांतील पारदर्शकता, संस्थात्मक गुणवत्ता आणि उत्तरदायित्व यावर विद्यापीठाने दाखवलेली कडक भूमिका शिक्षण व्यवस्थेतील एक नवदृष्टीकोन ठरतो आहे. विशेष म्हणजे हे निर्णय तात्कालिक समस्यांवर उपाय म्हणून न घेतले गेले, तर दीर्घकालीन शैक्षणिक आरोग्यासाठी एक ठोस आराखडा म्हणून समोर आले आहेत. १) सामूहिक कॉपीविरोधात कठोर कारवाई: नैतिक शिक्षणासाठीचा पहिला टप्पा शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर चारित्र्य घडवणारी प्रक्रिया. परीक्षांमध्ये सामूहिक कॉपीसारख्या घटना केवळ शिक्षण व्यवस्थेचे अपयशच दाखवत नाहीत, तर संपूर्ण समाजाच्या नैतिक अधःपतनाचे लक्षण ठरतात. जालना, बीड, पाथ्रीसारख्या ठिकाणी आढळलेल्या कॉपीच्या घटनांनी या समस्येची तीव्रता अधोरेखित केली. विद्यापीठ प्रशासनाने यावर घेतलेली ठाम भूमिका, जसे की मत्स्योदरी विधी महाविद्यालयात ४५ विद्यार्थ्यांवर कारवाई, तसेच पाथ्रीच्या केंद्राचा निकाल रद्द करणे—ही कारवाई केवळ शिक्षेपुरती मर्यादित नसून, ती एक मूल्याधिष्ठित संदेशवाहक ठरते. विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिक प्रयत्नांच्या महत्त्वाची जाणीव निर्माण करण्याचा उद्देश या निर्णयातून स्पष्ट होतो. २. नॅक नसलेल्या महाविद्यालयांवर प्रवेशबंदी: गुणवत्ता हेच प्रवेशाचे निकष आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण संस्थांची गुणवत्ता ही केवळ परवाना नसून, ती एक सामाजिक आणि शैक्षणिक जबाबदारी आहे. नॅक मूल्यांकन हा गुणवत्ता तपासण्याचा एक वैज्ञानिक आणि पारदर्शक निकष आहे. परंतु जेव्हा २३३ महाविद्यालये याकडे दुर्लक्ष करतात, तेव्हा विद्यापीठाच्या शिरस्त्याला आणि दर्जाला ते आव्हान ठरते. विद्यापीठाने प्रवेश बंदीचा घेतलेला निर्णय दीर्घदृष्टीने अत्यंत योग्य आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शैक्षणिक पायाभरणी भक्कम असावी लागते आणि ती गुणवत्ता नसेल तर प्रवेशालाही स्थान नसावे, हा विचार प्रत्येक संस्थेने अंगीकारण्याची गरज आहे. ३. सरप्राईज व्हिजीट आणि ‘बैठे पथक’: परीक्षा व्यवस्थापनात पारदर्शकतेचा नवा अध्याय कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी स्वतः आघाडी घेत परीक्षा केंद्रांवर अचानक भेटी देणे, हे त्यांच्या नेतृत्वगुणांचे प्रतीक आहे. एका महिन्यात ५० हून अधिक केंद्रांची पाहणी, दोषींवर दंड, आणि नोटीसांची प्रक्रिया हे दर्शवते की परीक्षा व्यवस्थापन आता केवळ औपचारिकता न राहता कर्तव्यनिष्ठा ठरत आहे. ‘बैठे पथक’ ही संकल्पना परीक्षा व्यवस्थापनातील एक क्रांतिकारी पाऊल आहे. परीक्षा काळात शिस्तबद्ध देखरेखीतून फक्त गैरप्रकार रोखले जाणार नाहीत, तर प्रामाणिक विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण होईल की त्यांच्या मेहनतीला न्याय मिळतो आहे. या तिन्ही कारवायांतून गुणवत्तापूर्ण, नैतिक आणि पारदर्शक शिक्षणव्यवस्था हीच आपली ओळख असेल. शिक्षणसंस्था ही केवळ ज्ञानदानाचे केंद्र नसते, ती सामाजिक बदलाची जननी असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव धारण करणाऱ्या संस्थेकडून हीच अपेक्षा होती, आणि आज विद्यापीठ ती प्रत्यक्षात उतरवत आहे, हाच संदेश विद्यापीठाच्या या कारवाईतून दिसून येत आहे. तुषार विष्णू वखरे मो-9881177933 #bamu #university #universityadmissions #universitylife #education #तुषारवखरे #tusharwakhare #NewsUpdate

No comments:

Post a Comment