Wednesday, May 21, 2025

पुन्हा कोरोना! सावधगिरी हाच उपाय!

माझं मत - बोल धडक...{पोस्ट क्रमांक -७} दिनांक २१ मे २०२५

"देव बंद झाले होते…
हॉस्पिटल ओसंडून वाहत होती…
स्मशानभूमीत रांगा लागल्या होत्या…
तरीही आपण काहीच शिकलो नाही?"

२०२० ते २०२२,
हा फक्त एक आकडा नाही. तो एक जळजळीत आठवण आहे. एका अशा काळाची की जिथे श्वास घेणे म्हणजे भाग्य, तर बाहेर पडणे म्हणजे जीवाशी खेळ. त्या काळात आपल्या डोळ्यांसमोर अनेक घरं उजाडली. बाप गेला, आई गेली, भाऊ, बहीण, मित्र, शिक्षक... आपले कोणीच वाचले नाही. आणि आज? पुन्हा एकदा तेच संकट हळूहळू, सावधपणे, पण निश्चितपणे उभे राहतेय. आपण मात्र पुन्हा एकदा निष्काळजीतेच्या गर्तेत जात आहोत.

कोरोना... एक शब्द जो संपूर्ण मानवजातीच्या इतिहासात कायमचा कोरला गेला आहे. २०२० ते २०२२ या काळात जगाने जी भीषण महामारी अनुभवली, ती आजही आपल्या मनात खोलवर रुतलेली आहे. बंद देवस्थाने, गर्दीने भरलेली हॉस्पिटले, रुग्णांच्या रांगा आणि स्मशानभूमीत वेटिंग... ही सगळी दृश्यं आपण विसरलेलो नाही. आणि म्हणूनच जेव्हा पुन्हा 'कोरोना आलाय' अशा बातम्या झळकतात, तेव्हा काळजी घेणे अपरिहार्य ठरते.
सध्या हाँगकाँग, सिंगापूर आणि आता मुंबईसारख्या शहरांत कोरोनाचे सौम्य रुग्ण आढळून येत आहेत. डॉक्टर आणि तज्ज्ञ सांगत आहेत की सध्या आढळणारी लक्षणं सौम्य स्वरूपाची आहेत. भारतात परिस्थिती चिंताजनक नाही. मात्र, सिंगापूरमध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच १४ हजार २०० नवे रुग्ण समोर आले. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या ३० टक्क्यांनी वाढली आहे. ही आकडेवारी आपण दुर्लक्षित करू शकत नाही.
एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो 'कोरोना गेला तरी होता का?' आपल्याला वाटलं होतं की कोरोना संपला. मात्र तो केवळ सौम्य स्वरूपात आपल्या आजूबाजूला होता, किंवा आपल्या लक्षात येण्याइतका प्रभावी नव्हता. पण विषाणूचे रूपांतर आणि पुन्हा एकदा संसर्ग वाढीची शक्यता नाकारता येत नाही.

आपण काय शिकलो? आणि काय विसरलो?

जरा आठवा…कधी आपल्या वडिलांसाठी रुग्णालयात बेड मिळेल का, म्हणून आपण दिवसभर हेलपाटे घातले होते…
कधी आपल्या आईच्या ऑक्सिजन लेव्हलसाठी आपण देव पाण्यात ठेवला होता…
कधी आपल्या लहान भावाला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे पाय धरले होते…
आणि हे सगळं करूनही काहींचे आप्तस्वकीय परत आले नाहीत.
महामारीच्या काळात प्रत्येक कुटुंबाने संघर्ष केला. ऑक्सिजनसाठी धावपळ, बेड मिळवण्यासाठी शिफारशी, रेशन आणि घरखर्चाची चिंता... हे सगळं आठवलं तरी अंगावर काटा येतो. पण या भयावह आठवणी असूनही आज आपण पुन्हा निष्काळजी झालो आहोत, हे चिंतेचे आहे. हे लिहिण्याचं उद्दिष्ट कोणत्याही प्रकारे भीती पसरवण्याचे नाही. उलट, काळजीपूर्वक आणि सजग राहण्याचा सल्ला देणे हे सामाजिक जबाबदारीचे लक्षण आहे. मास्क घालणे, हात धुणे, गर्दीत अंतर राखणे ही साधी पण प्रभावी शस्त्र आपण वापरायला हवीत. तसेच ताप, खोकला, सर्दी अशी लक्षण आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

सरकारी यंत्रणा आणि सामान्य जनता – दोघांचीही भूमिका महत्त्वाची

सरकार आणि आरोग्य यंत्रणांनी सजग राहायला हवे, पण त्याच वेळी नागरिकांनीही आपल्या कृतीने जबाबदारी घ्यायला हवी. मास्कची सक्ती झाली पाहिजे का, यापेक्षा लोकांनी मास्क का घालायला हवा, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आपणच जर स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतली नाही, तर कोण घेणार?. कोरोनाचा धोका अजूनही पूर्णपणे गेलेला नाही. आपण भीतीने नाही, पण जबाबदारीने वागायला हवे. इतिहास शिकवतो, आणि तो विसरणाऱ्यांना पुन्हा एकदा शिकवण्याचा प्रयत्न करतो. आपण तो धडा एकदाच शिकलो आहे. आता पुन्हा त्याची गरज पडू देऊ नका.

लोक म्हणतील – 'पुन्हा भीती पसरवू नका.'
पण मी म्हणतो – सावधगिरी म्हणजे भीती नव्हे, ती पुढच्या संकटाची तयारी आहे.

काळजी घ्या. सजग राहा. सावधगिरी बाळगा.

तुषार विष्णू वखरे
मो- 9881177933
#GMCH #maharashtra #तुषारवखरे #tusharwakhare #covid #covid_19 #coronavirus #healthtips #CoronaVirusUpdate #hongkong #switzerland #singapore

No comments:

Post a Comment