माझं मत - बोल धडक...{पोस्ट क्रमांक -६} दिनांक २० मे २०२५
विज्ञानविश्वातील एक उजळतं तेज मावळलंय. जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ, मराठी विज्ञानलेखक, आणि विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाचं बीज पेरणारे डॉ. जयंत नारळीकर यांचे पुण्यातील निवासस्थानी २० मे २०२५ रोजी निधन झाले. वयाच्या ८६व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक म्हणून त्यांची ओळख असली तरी मराठी मनांमध्ये, विशेषतः छत्रपती संभाजीनगरकरांच्या हृदयात, त्यांचे स्थान हे केवळ एका शास्त्रज्ञापुरते मर्यादित नव्हते, ते एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते.
२०१८ सालच्या १ डिसेंबरचा तो दिवस आजही शहरवासीयांच्या स्मरणात ताजा आहे. एमजीएम संस्थेच्या वतीने आयोजिलेल्या त्यांच्या व्याख्यानासाठी लोकांची गर्दी उसळली होती. ‘वैज्ञानिक दृष्टिकोन : विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जाणिवा समृद्ध करणारे विचार’ या विषयावर त्यांनी जे मार्गदर्शन केले, त्याने अनेक तरुणांच्या मनात विज्ञानाबद्दलची कुतूहलाची ठिणगी चेतवली. साध्या, रसाळ भाषेत, रोजच्या अनुभवांशी विज्ञानाची सांगड घालणाऱ्या त्यांच्या शैलीमुळे विद्यार्थ्यांनी केवळ ज्ञान घेतलं नाही, तर प्रेरणाही मिळवली.
या दौऱ्यात डॉ. नारळीकर आणि त्यांच्या पत्नी मंगला नारळीकर यांनी एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राला दिलेली भेटही विशेष लक्षात राहणारी ठरली. विज्ञान केंद्रात उभयतांनी विविध दालनांमधील प्रयोग पाहिले. ‘मॅजिक मिरर’मध्ये स्वतःच्याच अनंत प्रतिमा पाहून त्यांनी बालसुलभ आनंद व्यक्त केला. वेगवेगळ्या ग्रहांवरील वजन मोजणारे प्रयोग, तारांगणाची तांत्रिक माहिती, आणि गणित - भौतिक शास्त्राशी संबंधित प्रयोग पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
विज्ञानाची रुची निर्माण करणे हीच त्यांच्या जीवनकार्याची गाथा
‘आय लव्ह सायन्स’ या सेल्फी पॉइंटवर उभे राहून त्यांनी सेल्फीही काढले, आणि त्या एका क्षणाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरची आश्चर्याने भरलेली हास्यरेषा आजही आठवते. त्यांनी ग्रहणांशी निगडित अंधश्रद्धा दूर करण्यासाठी शिक्षणात्मक मॉडेल्स तयार करण्याचा सल्लाही दिला. विज्ञानाची रुची निर्माण करणे ही त्यांच्या जीवनकार्याची गाथा होती आणि ती छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून साकारली. त्यांच्या निधनानंतर, शहराच्या विज्ञानप्रेमी नागरिकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये दुःखाची लाट उसळली आहे. एखाद्या ध्रुवताऱ्याचा लोप झाल्यासारखं वाटतंय. जो दिशा दाखवायचा, अंधारात प्रकाश देत राहायचा.
डॉ. जयंत नारळीकर हे केवळ वैज्ञानिक नव्हते; ते आपल्या माणसांमध्ये मिसळणारे, संवाद साधणारे, आणि नवे विचार रुजवणारे वैज्ञानिक होते. त्यांच्या त्या एका दौऱ्याने छत्रपती संभाजीनगरच्या विज्ञान-भूमिकेला बळ दिले, आणि ती आठवण आजही शहरवासी हृदयाशी जपून आहेत.
आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांची शिकवण, त्यांचे मार्गदर्शन, आणि त्यांच्या डोळ्यांमधील विज्ञानासाठीचं तेज हे सगळं आपल्या आठवणींच्या आकाशात सदैव झळकत राहील.
तुषार विष्णू वखरे
मो- 9881177933
#jayantnaralikar #maharashtra #science #sciencefacts #scientist #tusharwakhare #तुषारवखरे #NewsUpdate Shrikant Yerule Shrinivas Siddheshwar Aundhkar
No comments:
Post a Comment