माझं मत - बोल धडक...{पोस्ट क्रमांक -२} दिनांक १९ मे २०२५
छत्रपती संभाजीनगरातील शिवाजीनगर भुयारी मार्ग हे आजच्या दिवसात ‘विकासकामांतील भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण’ बनले आहे. अवघ्या एका पावसाने हा कोट्यवधींचा प्रकल्प लक्तरं वेशीला टांगून गेला आहे. नागरिकांचे कररूपाने घेतलेले पैसे पाण्यात गेले, आणि प्रशासन, ठेकेदार मात्र अजूनही बेशरमपणे गप्प बसले आहेत.
१५ फेब्रुवारी २०२५ रोजी जल्लोषात उद्घाटन झालेल्या या भुयारी मार्गाचा पुरता अपमान झाला आहे. उद्घाटनाचे श्रेय घेण्यासाठी घाईघाईने आयोजित केलेल्या सोहळ्याचे फुगे आता फाटले आहेत. काही मंत्री अनुपस्थित होते, यावरूनच हा सोहळा राजकीय झगमगाटासाठीच होता, हे स्पष्ट होते.
रचनेत फसवणूक, नियोजनात ढिसाळपणा
२२.७६ मीटर लांब आणि ३.५० मीटर उंच असलेला भुयारी मार्ग केवळ ६.४२ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला. पण हा खर्च कुठे गेला? पावसात कमरेपर्यंत पाणी साचते, कारण पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था शून्य आहे. रस्ता खालचा, आउटलेट वरचे असा उलटा भूगोल फक्त सरकारी इंजिनियरिंगमध्येच शक्य आहे. यात कोणत्याही प्रकारचे तांत्रिक परीक्षण झाले की नाही, याचा तपास व्हावा लागेल. कारण हे काम पाहता, यामध्ये सरळसरळ भ्रष्टाचाराची दुर्गंधी येते.
मोठ्या गाड्यांना बंदी, भविष्यासाठी शून्य दृष्टी
रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन वेगळ्या यंत्रणांनी हे काम केल्याने गोंधळ उडालाच. पण प्रश्न असा आहे की, ‘भविष्यासाठी या मार्गाचा वापर कसा होईल’ याचा विचार कोणी केला का? मोठ्या बस, अगदी मिनी स्कूल बसही या मार्गातून जाऊ शकत नाहीत. मग हा भुयारी मार्ग आहे की खिल्ली?
लोकशाहीचा अपमान आणि जनतेचा संताप
सोशल मीडियावर या भुयारी मार्गाची दैना व्हिडियो, फोटोच्या माध्यमातून व्हायरल झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ईमेल द्वारे तक्रार केली. देशमुख यांनी जे मुद्दे मांडले आहेत, ते केवळ राजकीय नाहीत. ते जनतेच्या मनातला आक्रोश आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ठेकेदार आणि दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, ती अत्यंत योग्य आहे. केवळ एका पावसात जर कोट्यवधींचा रस्ता कोलमडतो, तर यामागे फक्त ‘बेकार काम’ नाही, तर ठोस फसवणूक आणि भ्रष्टाचार आहे.
सरकारला जनता मूर्ख वाटते का?
एका रस्त्याचे काम करताना इतक्या मूलभूत चुका करणारे अभियंते, ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना जर वेळेवर शिक्षा झाली नाही, तर हेच पुढील योजनांमध्येही लोकांच्या पैशांचा चुराडा करतील. ही जबाबदारी राजकीय नेत्यांनी झटकून चालणार नाही. लोकशाहीमध्ये जबाबदारी ही निवडणूक संपल्यानंतर संपत नाही. ती रोज सिद्ध करावी लागते. शिवाजीनगर भुयारी मार्ग हे केवळ पाण्याने साचलेले नव्हे, तर नागरिकांच्या आशा-अपेक्षांनी डुबलेले प्रकल्प आहे. जर यावर त्वरित आणि ठोस कारवाई झाली नाही, तर हा केवळ विकासकामांचा अपमान नाही, तर लोकशाहीचा गळा घोटण्यासारखा प्रकार ठरेल. जनतेच्या पैशांशी गद्धाफीशाही वागणाऱ्यांना आता शिक्षा झालीच पाहिजे!
तुषार विष्णू वखरे
मो- 9881177933
#railway #bridge #तुषारवखरे #tusharwakhare #aurangabad #sambhajinagar #NewsUpdate
No comments:
Post a Comment