Wednesday, May 21, 2025

दोषींवर कारवाई, सेवाभावात संवेदनशीलता

माझं मत - बोल धडक ...{पोस्ट क्रमांक ५ } - २० मे २०२५)


छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटीत १८ मे २०२५ रोजी घडलेली घटना दुर्दैवी होती हे खरे. एका रुग्णाचा मृत्यू झाला. कारण काय? रुग्णवाहिकाचालकाची हलगर्जी. नातेवाईकांनी थेट तक्रार केली आणि समाजमाध्यमांपासून वृत्तपत्रांपर्यंत यावर संताप व्यक्त झाला.

घडलेली दुर्दैवी घटना केवळ एक अपवादात्मक प्रकार असला, तरीही या घटनेनंतर प्रशासनाने घेतलेली तत्काळ कारवाई आणि रुग्णसेवेविषयी दाखवलेली संवेदनशीलता ही अत्यंत स्तुत्य आहे. 'रुग्णवाहिका चालकाच्या हलगर्जीपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू' झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आणि त्यावर अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे Shivaji Sukre यांनी कोणतीही वेळ न दवडता तात्काळ चौकशीचे आदेश देत दोषी चालकावर चौकशी होईपर्यंत निलंबनाची कारवाई केली. आणि चौकशीसाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना झाली.
आजच्या काळात जेथे अनेकदा प्रशासनाकडून कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केली जाते, तिथे डॉ. सुक्रे यांची कामातील तत्परता आणि मानवी मूल्यांना दिलेले महत्त्व याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. डॉ. शिवाजी सुक्रे हे नाव गेल्या काही वर्षांपासून वैद्यकीय प्रशासनात ‘कार्यक्षमते’चे प्रतिक बनून झळकत आहे. 

ही आहे खरी 'Accountability' – जबाबदारीची भावना

कारवाई झाली, ती त्वरित. झाकून न टाकता. गुन्हा झाला, तर त्याला शिक्षा ठरली. ही घटना एक अपवाद होती. पण डॉ. सुक्रे यांचे यावर उत्तर ‘सिस्टम क्लीन’ करण्याचे ठरले. अधिष्ठाता पदावर आलेल्या डॉ. सुक्रे यांनी 'माझं रुग्णालय' हे तत्त्व स्वीकारले आहे. आजच्या घडीला घाटीत रुग्णसेवेसाठी ७१० कोटी सर्जिकल इमारतीसाठी, २५ कोटी सीसीयू युनिटसाठी आणि ४५ कोटी ईडब्ल्यूएस रुग्णांसाठी असे भरीव निधी केंद्र व राज्य सरकारकडून मंजूर झाले आहेत. हे सहजासहजी घडलेले नाही. हे प्रशासन, राजकीय इच्छाशक्ती आणि नेतृत्व एकत्र आल्यामुळे शक्य झाले आहे.

शिस्तबद्ध कामकाजावर आरोपांची चिखलफेक नको

वास्तविकता डॉ. सुक्रे हे सामान्य रुग्णाच्या वेदनेला समजून घेणारे नेतृत्व आहे. एखाद्या गरीब रुग्णाकडे औषधासाठी पैसे नसतील तर ते स्वतःच्या खिशातून पैसे देऊन औषधे पुरवतात. हे असे नेतृत्व आहे जे ‘सिरिअसली’ रुग्णसेवेला आपले कर्तव्य समजते, केवळ ‘पोस्ट’ म्हणून नाही, तर ‘प्रोमिस’ म्हणून.
पण जेव्हा एक कर्मचारी चूक करतो, तेव्हा त्याचे खापर सगळ्या यंत्रणेवर फोडणं कितपत योग्य?
चांगल्या प्रशासनावर, प्रामाणिक डॉक्टरांवर, रात्रंदिवस झगडणाऱ्या नर्सेसवर आणि आपल्या रुग्णालयातील शिस्तबद्ध कामकाजावर अशीच सतत आरोपांची चिखलफेक होत राहिली तर कोण काम करायला पुढे येईल?

ही घटना केवळ 'एक बिघडलेली कडी' होती. पण साखळी तुटू दिली गेली नाही, ती तत्काळ प्रतिसादामुळे. आपण फक्त एवढं लक्षात घेतले पाहिजे. जेव्हा काही चुकतं तेव्हा संपूर्ण व्यवस्था वाईट नसते. चूक झाली ते मान्य करून कारवाई करणे, हीच तर खरी व्यवस्थेची ताकद असते. डॉ. शिवाजी सुक्रे हे याचे उत्तम उदाहरण आहेत.

आज घाटीमध्ये दररोज हजारो रुग्णांची तपासणी होते, गंभीर शस्त्रक्रिया पार पडतात, वैद्यकीय शिक्षण घेतले जाते, संशोधन चालते. पण एक अपवादात्मक घटना संपूर्ण प्रगतीवर पाणी फेरते.
पण त्याचवेळी योग्य काम करणाऱ्या नेतृत्वाला पाठबळ द्यायचे धाडसही आपण दाखवायला हवे. डॉ. सुक्रे यांच्या रूपाने घाटी रुग्णालयात नवा अध्याय सुरू झाला आहे. पारदर्शकता, जबाबदारी, आणि मानवी संवेदना यांचा संगम. ही ऊर्जा फक्त टीकेने नाही तर सकारात्मक पाठींब्याने टिकवता येईल.

तुषार विष्णू वखरे
मो- 9881177933
#GMCH #aurangabad #maharashtra #BreakingNews #तुषारवखरे #tusharwakhare #education #medicalcollege Shankarrao Adsul Shivaji Sukre

'पत्रकाराच्या हाताला १० टाके, पण यंत्रणांच्या डोळ्यांवर पट्टी!' - अन्यायाविरुद्ध लढणारा पत्रकार ताटकळतोय, आरोपी मोकाट फिरतायत!

माझं मत - बोल धडक...{पोस्ट क्रमांक -४} दिनांक १९ मे २०२५


'खरं सांगणं गुन्हा ठरतंय, अन्यायाविरोधात आवाज उठवणं शिक्षा ठरतंय.' आज एक पत्रकार हाताला प्लास्टर बांधून न्यायासाठी गाऱ्हाणं घालत राहीला आहे, आणि पोलीस व आरोग्य यंत्रणा त्याला उत्तर देतायत “एमएलसी नाही मिळाला अजून, बघतो काय करता येतंय!” 

छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार विजयकुमार साबळे यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या स्वतःच्या शेतात गेल्याच्या कारणावरून, त्यांच्या सख्ख्या चुलत भावाकडून, पुतण्याकडून आणि वहिनीच्या हातून बेदम मारहाण झाली. पाठीवर काठी, डोक्यावर वार, हात मोडला गेला. पत्नीला लाथा-बुक्क्यांचा प्रसाद देण्यात आला.
गंभीर मारहाणीच्या गुन्ह्यात 'एफआयआर' दाखल होऊनही (गु.र.नं. ८२/२०२५), आठवड्यानंतरही आरोपी मोकाट फिरत आहेत. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 'एमएलसी रिपोर्ट मिळालेला नाही. वैद्यकीय अधिकारी रजेवर आहेत.' त्यामुळे अटक प्रक्रिया थांबली आहे. म्हणजे एखाद्याच्या हातावर १० टाके पडूनही, शस्त्रक्रिया झाल्यानंतरही 'एमएलसी मिळेपर्यंत काहीच होऊ शकत नाही' हे उत्तर कायद्याच्या अंमलबजावणी यंत्रणेला शोभते का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आरोग्य यंत्रणेची उदासीनता – जबाबदारी कुणाची?

फुलंब्री आरोग्य केंद्रातील संबंधित डॉक्टर आठवडाभर रजेवर आहेत. एवढ्या मोठ्या कालावधीत कुठलाही चार्ज न देणे, कोणी जबाबदारी न घेणे, ही व्यवस्थेची गंभीर बेजबाबदारी दाखवते. एक सामान्य नागरिक काय किंवा पत्रकार काय सर्वांना न्याय मिळवण्यासाठी अशीच वणवण करावी लागणार का?

सोशल मीडियावर संताप – ‘पत्रकार असताना हे, तर सामान्यांचे काय?’

साबळे यांनी सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केल्यानंतर प्रकरणाचा गाजावाजा झाला. अनेकांनी पोलीस आणि आरोप प्रशासनाशी संपर्क साधला. मात्र, केवळ ‘एमएलसी नाही’ असं समोर आलंय. केवळ या कारणाने संपूर्ण गुन्हा थांबवणे म्हणजे व्यवस्थेच्या ढिसाळतेचे जिवंत उदाहरण आहे.
आठवड्याभरात 'एमएलसी' का मिळत नाही?, संबंधित डॉक्टरांच्या अनुपस्थितीत चार्ज का देण्यात आला नाही?, पोलीस तपास ' एमएलसी वर अवलंबून' ठेवून कायद्यातील कोणते तत्व पाळले जाते आहे?, पीडिताच्या जीवाला धोका असूनही आरोपी मोकाट का? हे प्रश्न या टोलवाटोलवीत अनुत्तरितच राहत आहे.  जर एका पत्रकाराला न्यायासाठी सोशल मीडियावर जावे लागले, तर सामान्य नागरिकांनी कुणाकडे धाव घ्यायची? पत्रकाराने सोशल मीडियावर आवाज उठवला नसता, तर ही केस 'दप्तरीतच' राहिली असती. असो,  मुळात न्यायव्यवस्थेतील गढूळ पाणी स्पष्टपणे जनतेसमोर उघड होऊ नये यासाठी दोषींवर कारवाई व्हावी, एमएलसीचा मुद्दा काढून वेळकाढूपणा थांबावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

तुषार विष्णू वखरे 
मो- 9881177933
#CrimeNews #policeofficer #police #HealthDepartment #aurangabad #maharashtra #tusharwakhare #तुषारवखरे #newstoday #justice Vijay Sable

शिवाजीनगर रेल्वे ब्रिज प्रकरण: ‘निकृष्ट नियोजनाची चिठ्ठी’ – जबाबदाऱ्यांच्या खापरफोडीचा खेळ!

माझं मत - बोल धडक...{पोस्ट क्रमांक -३} दिनांक १९ मे २०२५

छत्रपती संभाजीनगरमधील शिवाजीनगर येथील रेल्वे फाटक क्र. ५५ जवळील रोड अंडर ब्रिज (सब-वे) मध्ये पावसामुळे साचलेल्या पाण्याने स्थानिक नागरिकांची डोकेदुखी वाढवली आहे. पावसाच्या काही तासांतच शहराचे नियोजन, प्रशासनाची सजगता, आणि लोकप्रतिनिधींची ‘डोळस’ निरीक्षणे यांची पोलखोल झाली. नागरिक संतप्त आहेत, तर जबाबदार यंत्रणा एकमेकांवर दोष ढकलण्यात मश्गूल आहेत.

रेल्वे विभागाने दिलेल्या निवेदनानुसार, त्यांनी आपले काम 'योग्य पद्धतीने' पूर्ण केले आहे. ड्रेनेज यंत्रणा, रिसीव्हिंग चेंबर, पंपिंग सिस्टम आणि साफसफाईचे मॅनहोल इ. बाबींचा उल्लेख करत रेल्वेने सर्व दोष सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) आणि महानगरपालिकेकडे ढकलला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पीडब्ल्यूडीच्या अपूर्ण स्टॉर्म वॉटर ड्रेनमुळे आणि महानगरपालिकेच्या विलंबामुळे ही परिस्थिती निर्माण झाली.
रेल्वे विभाग म्हणतो, त्यांनी १.२ मीटरच्या ह्यूम पाईपचा ड्रेन, रिसीव्हिंग चेंबर, आणि साफसफाईची व्यवस्था केली होती. मग प्रश्न असा आहे की, पावसाच्या एका सत्रातच ही व्यवस्था अपयशी का ठरली? जर रिसीव्हिंग चेंबरचे बांधकाम सक्षम असते, तर त्याची भिंत तुटण्याइतका पाण्याचा दाब का झाला? आणि जर ड्रेनेज कार्यरत असते, तर ती कोंडी का झाली?

लोकप्रतिनिधींचा ‘दिखावा’ आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील शंका

घटनेनंतर लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. पण नागरिक याला ‘दिखावा’ आणि निवडणूकपूर्व ‘नाटक’ म्हणून पाहत आहेत. 'आता लक्षात येते का? की निवडणुका जवळ आल्यावरच जमिनीवर येण्याची वेळ येते!' असा रोष व्यक्त करत नागरिक म्हणतात की, 'आश्वासनांची खैरात पुरे झाली, आता हिशेब मागण्याची वेळ आली आहे!'

महानगरपालिका व पीडब्ल्यूडीची कुचराई – अर्धवट कामांची कहाणी

पीडब्ल्यूडीने अद्याप पूर्ण न केलेले स्टॉर्म वॉटर ड्रेनचे काम आणि महानगरपालिकेने अद्याप न जोडलेली विद्यमान ड्रेन यामुळे रस्त्यावर पाणी साचले. अशा अर्धवट आणि पळवाट धोरणांमुळे सर्वस्वी नुकसान स्थानिक नागरिकांचे होते. सार्वजनिक निधी खर्च होतो, पण नियोजनाचा अभाव आणि यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव सतत नागरिकांच्या जीवावर बेततो.

या संपूर्ण प्रकरणाने पुन्हा एकदा स्पष्ट केलंय की, यंत्रणांच्या निष्काळजीपणाने आणि लोकप्रतिनिधींच्या अलिप्ततेने सामान्य माणसाच्या अडचणी वाढत आहेत. पावसाच्या एका दिवशी शहराची व्यवस्थाच ढासळते, हे शहर नियोजनाचे दुर्दैवच आहे. हात झटकणे, दुसऱ्यावर खापर फोडणे, आणि नंतर कामकाजाचे ‘नाट्य’ करणे हीच यंत्रणांची सध्याची कार्यपद्धती आहे. पण यावेळी जनतेचा संताप उफाळलेला आहे, आणि 'धडा शिकवू' हे फक्त शब्द न राहता कृतीत उतरतील, अशीच अपेक्षा आहे.

तुषार विष्णू वखरे
मो-9881177933

#railway #PWD #pwddepartment #bridge #aurangabad #तुषारवखरे #tusharwakhare #NewsUpdate #Sambhajinagar #PWDMinister

शिवाजीनगर भुयारी मार्ग : भ्रष्टाचारी विकासाचा पाण्यात बुडालेला पुरावा!

माझं मत - बोल धडक...{पोस्ट क्रमांक -२} दिनांक १९ मे २०२५
छत्रपती संभाजीनगरातील शिवाजीनगर भुयारी मार्ग हे आजच्या दिवसात ‘विकासकामांतील भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण’ बनले आहे. अवघ्या एका पावसाने हा कोट्यवधींचा प्रकल्प लक्तरं वेशीला टांगून गेला आहे. नागरिकांचे कररूपाने घेतलेले पैसे पाण्यात गेले, आणि प्रशासन, ठेकेदार मात्र अजूनही बेशरमपणे गप्प बसले आहेत.
१५ फेब्रुवारी २०२५ रोजी जल्लोषात उद्घाटन झालेल्या या भुयारी मार्गाचा पुरता अपमान झाला आहे. उद्घाटनाचे श्रेय घेण्यासाठी घाईघाईने आयोजित केलेल्या सोहळ्याचे फुगे आता फाटले आहेत. काही मंत्री अनुपस्थित होते, यावरूनच हा सोहळा राजकीय झगमगाटासाठीच होता, हे स्पष्ट होते.

रचनेत फसवणूक, नियोजनात ढिसाळपणा

२२.७६ मीटर लांब आणि ३.५० मीटर उंच असलेला भुयारी मार्ग केवळ ६.४२ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला. पण हा खर्च कुठे गेला? पावसात कमरेपर्यंत पाणी साचते, कारण पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था शून्य आहे. रस्ता खालचा, आउटलेट वरचे असा उलटा भूगोल फक्त सरकारी इंजिनियरिंगमध्येच शक्य आहे. यात कोणत्याही प्रकारचे तांत्रिक परीक्षण झाले की नाही, याचा तपास व्हावा लागेल. कारण हे काम पाहता, यामध्ये सरळसरळ भ्रष्टाचाराची दुर्गंधी येते.

मोठ्या गाड्यांना बंदी, भविष्यासाठी शून्य दृष्टी

रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन वेगळ्या यंत्रणांनी हे काम केल्याने गोंधळ उडालाच. पण प्रश्न असा आहे की, ‘भविष्यासाठी या मार्गाचा वापर कसा होईल’ याचा विचार कोणी केला का? मोठ्या बस, अगदी मिनी स्कूल बसही या मार्गातून जाऊ शकत नाहीत. मग हा भुयारी मार्ग आहे की खिल्ली?

लोकशाहीचा अपमान आणि जनतेचा संताप

सोशल मीडियावर या भुयारी मार्गाची दैना व्हिडियो, फोटोच्या माध्यमातून व्हायरल झाले. त्यानंतर  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ईमेल द्वारे तक्रार केली. देशमुख  यांनी जे मुद्दे मांडले आहेत, ते केवळ राजकीय नाहीत. ते जनतेच्या मनातला आक्रोश आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ठेकेदार आणि दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, ती अत्यंत योग्य आहे. केवळ एका पावसात जर कोट्यवधींचा रस्ता कोलमडतो, तर यामागे फक्त ‘बेकार काम’ नाही, तर ठोस फसवणूक आणि भ्रष्टाचार आहे.

सरकारला जनता मूर्ख वाटते का?

एका रस्त्याचे काम करताना इतक्या मूलभूत चुका करणारे अभियंते, ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना जर वेळेवर शिक्षा झाली नाही, तर हेच पुढील योजनांमध्येही लोकांच्या पैशांचा चुराडा करतील. ही जबाबदारी राजकीय नेत्यांनी झटकून चालणार नाही. लोकशाहीमध्ये जबाबदारी ही निवडणूक संपल्यानंतर संपत नाही. ती रोज सिद्ध करावी लागते. शिवाजीनगर भुयारी मार्ग हे केवळ पाण्याने साचलेले नव्हे, तर नागरिकांच्या आशा-अपेक्षांनी डुबलेले प्रकल्प आहे. जर यावर त्वरित आणि ठोस कारवाई झाली नाही, तर हा केवळ विकासकामांचा अपमान नाही, तर लोकशाहीचा गळा घोटण्यासारखा प्रकार ठरेल. जनतेच्या पैशांशी गद्धाफीशाही वागणाऱ्यांना आता शिक्षा झालीच पाहिजे!

तुषार विष्णू वखरे
मो- 9881177933
#railway #bridge #तुषारवखरे #tusharwakhare #aurangabad #sambhajinagar #NewsUpdate

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नवदृष्टीकोन: शिस्त, गुणवत्ता आणि पारदर्शकतेचा आदर्श

माझं मत - बोल धडक...{पोस्ट क्रमांक -१} दिनांक १९ मे २०२५ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अलीकडे घेतलेल्या निर्णायक निर्णयांमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात एक सकारात्मक हलकल्लोळ निर्माण झाला आहे. परीक्षांतील पारदर्शकता, संस्थात्मक गुणवत्ता आणि उत्तरदायित्व यावर विद्यापीठाने दाखवलेली कडक भूमिका शिक्षण व्यवस्थेतील एक नवदृष्टीकोन ठरतो आहे. विशेष म्हणजे हे निर्णय तात्कालिक समस्यांवर उपाय म्हणून न घेतले गेले, तर दीर्घकालीन शैक्षणिक आरोग्यासाठी एक ठोस आराखडा म्हणून समोर आले आहेत. १) सामूहिक कॉपीविरोधात कठोर कारवाई: नैतिक शिक्षणासाठीचा पहिला टप्पा शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर चारित्र्य घडवणारी प्रक्रिया. परीक्षांमध्ये सामूहिक कॉपीसारख्या घटना केवळ शिक्षण व्यवस्थेचे अपयशच दाखवत नाहीत, तर संपूर्ण समाजाच्या नैतिक अधःपतनाचे लक्षण ठरतात. जालना, बीड, पाथ्रीसारख्या ठिकाणी आढळलेल्या कॉपीच्या घटनांनी या समस्येची तीव्रता अधोरेखित केली. विद्यापीठ प्रशासनाने यावर घेतलेली ठाम भूमिका, जसे की मत्स्योदरी विधी महाविद्यालयात ४५ विद्यार्थ्यांवर कारवाई, तसेच पाथ्रीच्या केंद्राचा निकाल रद्द करणे—ही कारवाई केवळ शिक्षेपुरती मर्यादित नसून, ती एक मूल्याधिष्ठित संदेशवाहक ठरते. विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिक प्रयत्नांच्या महत्त्वाची जाणीव निर्माण करण्याचा उद्देश या निर्णयातून स्पष्ट होतो. २. नॅक नसलेल्या महाविद्यालयांवर प्रवेशबंदी: गुणवत्ता हेच प्रवेशाचे निकष आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण संस्थांची गुणवत्ता ही केवळ परवाना नसून, ती एक सामाजिक आणि शैक्षणिक जबाबदारी आहे. नॅक मूल्यांकन हा गुणवत्ता तपासण्याचा एक वैज्ञानिक आणि पारदर्शक निकष आहे. परंतु जेव्हा २३३ महाविद्यालये याकडे दुर्लक्ष करतात, तेव्हा विद्यापीठाच्या शिरस्त्याला आणि दर्जाला ते आव्हान ठरते. विद्यापीठाने प्रवेश बंदीचा घेतलेला निर्णय दीर्घदृष्टीने अत्यंत योग्य आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शैक्षणिक पायाभरणी भक्कम असावी लागते आणि ती गुणवत्ता नसेल तर प्रवेशालाही स्थान नसावे, हा विचार प्रत्येक संस्थेने अंगीकारण्याची गरज आहे. ३. सरप्राईज व्हिजीट आणि ‘बैठे पथक’: परीक्षा व्यवस्थापनात पारदर्शकतेचा नवा अध्याय कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी स्वतः आघाडी घेत परीक्षा केंद्रांवर अचानक भेटी देणे, हे त्यांच्या नेतृत्वगुणांचे प्रतीक आहे. एका महिन्यात ५० हून अधिक केंद्रांची पाहणी, दोषींवर दंड, आणि नोटीसांची प्रक्रिया हे दर्शवते की परीक्षा व्यवस्थापन आता केवळ औपचारिकता न राहता कर्तव्यनिष्ठा ठरत आहे. ‘बैठे पथक’ ही संकल्पना परीक्षा व्यवस्थापनातील एक क्रांतिकारी पाऊल आहे. परीक्षा काळात शिस्तबद्ध देखरेखीतून फक्त गैरप्रकार रोखले जाणार नाहीत, तर प्रामाणिक विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण होईल की त्यांच्या मेहनतीला न्याय मिळतो आहे. या तिन्ही कारवायांतून गुणवत्तापूर्ण, नैतिक आणि पारदर्शक शिक्षणव्यवस्था हीच आपली ओळख असेल. शिक्षणसंस्था ही केवळ ज्ञानदानाचे केंद्र नसते, ती सामाजिक बदलाची जननी असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव धारण करणाऱ्या संस्थेकडून हीच अपेक्षा होती, आणि आज विद्यापीठ ती प्रत्यक्षात उतरवत आहे, हाच संदेश विद्यापीठाच्या या कारवाईतून दिसून येत आहे. तुषार विष्णू वखरे मो-9881177933 #bamu #university #universityadmissions #universitylife #education #तुषारवखरे #tusharwakhare #NewsUpdate

Friday, September 3, 2021

नाभिक समाजाच्या प्रगतीला हवीय संघटनात्मक कृतीची जोड

  नाभिक समाजातील एक ज्वलंत दीप तेवत ठेवणारे थोर समाज सुधारक राष्ट्रसंत श्री सेना महाराज यांनी उभ आयुष्य नाभिक समाजासाठी अर्पण करून त्यांनी अभंगवाणीतून समाजात परिवर्तनाची ज्योत निर्माण केली. तत्कालीन वर्णभेद, बालविवाह, सतीप्रथा आदी वाईट चालीरीतीच्या कुप्रथेतून मानवी जीवनाला भयमुक्त करून मानवी जीवनाला स्वतंत्र जीवन जगण्यासाठी त्यांनी प्रेरणा दिली. संत सेना महाराजांनी अंधश्रध्देत गुरफटलेल्या समाजाला प्रयत्नवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने समाजबांधव एकत्र येऊन धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत आलाय. हे करत असतानाच आता विचारांची देवाणघेवाण, आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल चर्चा, व्यवसायातील पुढील आव्हाने आदी बाबींवरही विचारमंथन होण्याची गरज निर्माण झाली आहे. दहा ते पंधरा वर्षांपासून समाजाला वरदान लाभलेल्या कलेवर परप्रांतिय, धनधांडग्यांनी अतिक्रमणे करण्यास सुरूवात केली. कार्पोरेट कंपन्या सलून व्यवसायात उतरल्या. केश कापण्याबरोबरच दाढी करणे म्हणजे केशकर्तन नव्हे याही पलिकडे जाऊन या व्यवसायाला अधिक व्यापक कसे करता येते, हे कार्पोरेट कंपन्यांनी दाखवून दिले. मुलांमुलींतील वाढत्या सौंदर्याच्या कल्पनांमुळे हा व्यवसाय अधिकच व्यापक झाला. केशकर्तनाचा ‘व्यवसाय’ करून सौंदर्य प्रसाधने उत्पादन कंपन्यांनी आणि केशकर्तनाच्या कार्पोरेट कंपन्यांनी फ्रेंचाइजी देण्यास सुरूवात केली. केशकर्तनाचेच काम अत्यंत सुबक आणि व्यावसायिक पध्दतीने कसे करावे याचे तंत्र त्यांनी अंमलात आणले. नाभिक समाजाच्या पारंपारिक व्यवसायाला ग्लोबल टच आणि कार्पोरेट लूक देऊन शिवाय देणाऱ्या सेवांचे ‘मोल’ कसे घेता येऊ शकते, याची समाज बांधवाला शिकवण दिली. हेअर कट, फेशियल, मसाज, हेड मसाज, हेअर डाय, ब्लिचिंग इतकेच नव्हे तर नखेदेखील वेगळ्या पध्दतीने कापून त्याचेदेखील सौंदर्य वाढविता येते. चेहऱ्यावरील व्रण घालविण्यासाठीच्या थेरपीची कामे हायटेक सलुनच्या माध्यमातून करण्यात येते हे दाखवून दिले. आधुनिकतेची कास धरत समाजाच्या व्यवसायावर नाभिक समाजेत्तर लोकांनी कब्जा मिळविण्याने हाताच्या कारागिरांवर उपाशी मरण्याची नामुष्की ओढवली. शहरी भागात समाजबांधव पारंपारिक दुकानांना ‘सलुन्स’चे लूक देत आहेत. रंगसंगती, आरामदायी खुर्च्या, अत्याधुनिक साधन-सामुग्रीचा वापर करून इतरांप्रमाणे ‘हायटेक’ होत आहेत. परंतु, ग्रामीण भागातील कारागिर हा अत्याधुनिक ज्ञानापासून अजूनही कोसोदूर आहे. कार्पोरेट कंपन्यांनी शहरी भागात जसा शिरकाव केला तसाच ग्रामीण भागात शिरकाव केल्यास ग्रामीण भागातील कारागिरांना भविष्यात उपासमारीचाच सामना करावा लागणार आहे. कारण ग्रामीण भागात सुमारे ६० ते ७० टक्के समाज आपल्या पारंपारिक सलून व्यवसायात कार्यरत आहे. आधुनिकतेची कास धरूनच त्यांना भविष्यात पारंपारिक व्यवसाय टिकविणे शक्य होणार आहे. शहरी भागातील तज्ज्ञ बांधवांनी ग्रामीण भागातील कारागिरांना अत्याधुनिकतेचे प्रशिक्षण देऊन ‘तज्ज्ञ’ करणे काळाची गरज बनली आहे. सामुहिक चिंतनाची गरज कोरोना विषाणुने संपूर्ण जगामध्ये अक्षरश: धुमाकुळ घातला. लॉकडाऊन घोषित झाल्यापासून आपले राष्ट्रीय व नैतिक कर्तव्य समजून सलून व्यावसायिकांनी आपला नियमित खर्च, दुकान भाडे, वीजबिल, कर्ज देणी याची पर्वा न करता आपापली दुकाने बंद ठेऊन राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविला. सलून व्यवसाय हेच एकमेव उत्पन्नाचे साधन असलेल्यांवर लॉकडाऊनच्या काळात उपासमारीची वेळ आली. उत्पन्न घटल्याने समाज बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण होते. तरीही वैयक्तिक संकटांपेक्षा राष्ट्रीय संकटाशी झुंज देणे समाजबांधवांनी आपले आद्य कर्तव्य मानले. तरीसुध्दा समाज माध्यमावरून टिका आणि टिंगल टवाळकी नाभिकांचीच झाली. कोरोना विषाणूच्या संसर्गाकरिता सलून व्यावसायिक जवाबदार असल्याचा जावईशोध अनेकांनी लावला. असे असले तरीही लॉकडाऊनच्या काळात सलून दुकाने बंद असल्याने केस-दाढी वाढल्यानंतर समाजाची अनेकांना आठवण नक्कीच झाली. डोक्यावरील वाढलेले केस, दाढी या समस्येवर पर्याय शोधत अनेकांनी घरच्या घरी कटींग, दाढी करण्याची मोहिम हाती घेतली. अत्याधुनिक मशिनरीचा वापर करून ‘टक्कल’ केले. बायका, पोरांची ‘कलाकारी’चर्चेत येण्यासाठी सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल केल्या. टिंगल-टवाळकीच्या भावनेतून तयार झालेल्या अशा पोस्टला समाजबांधवांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. वाढते शहरीकरण, लोकांच्या गरजा लक्षात घेऊन बलुतेदारी पध्दतीत बदल करून उन्नतीसाठी ‘दुकानदारी’ करायला हवी. कोरोनानंतर सलून व्यवसायामध्ये सकारात्मक बदल झाले आहे. कोरोनामुळे प्रत्येक व्यक्ती आरोग्याविषयी जागृत होऊन पैशांपेक्षा आपला जीव, आरोग्य महत्वाचे समजू लागला आहे. हीच बाब हेरून ग्राहकांच्या आरोग्यविषयक दृष्टिकोनातूनही समाज बांधवाला बदल करणे आवश्यक आहे. हे कार्य कोणा एकाचे नसून याकरीता सामूहिक समन्वय आणि कृतीची गरज आहे. आपल्या जवळ उपलब्ध असलेल्या साधनांचा संघटनांमध्ये सुरू असलेले वाद उफाळून काढणे, एकमेकांवर टिका टिपण्णी करण्यापेक्षा व्यावसाय वृध्दीच्या अनुषंगाने एकमेकांशी संवाद स्थापित करून व्यवसायाची दिशा निश्चित करण्याची गरज आहे. समाजातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच कार्यकर्त्यांनी समन्वयाची भूमिका बजावून आपल्या भागाची गरज, जीवन शैली आदींचा अभ्यास करून व्यावसायिक पध्दती, प्रक्रियेचा आराखडा तयार करायला हवा. श्री संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीदिनी सकारात्मकतेची कास धरण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केल्यास नक्कीच वैक्तिगत अन् समाजाची प्रगती साधली जाऊ शकते. तुषार विष्णू वखरे (औरंगाबाद) मो-९८८११७७९३३

Friday, March 19, 2021

प्रणाली तू असं करायला नको होतंस....

बहिणीची मैत्रीण प्रणाली हिने आत्महत्या केल्याचे कळताच घरातील सर्वच सदस्यांना धक्का बसला. प्रणालीचे लग्न बँकेतील अधिकाऱ्यांसोबत ठरले हे सांगताना काही वर्षांपूर्वी ती स्वप्नांच्या दुनियेत रंगून गेली होती. वराकडील मंडळींनी हुंडा मागितला हे सांगताना मात्र तिचा चेहरा पडलेला होता. मुलीचे कल्याण होईल, ती सुखी राहील या आशेने तिच्या आई- वडिलांनी वराकडील मंडळींच्या प्रत्येक मागणी, गोष्टींची पूर्तता करून थाटात लग्न लावले. लग्नात अपेक्षेपेक्षा जास्त देऊनही सासरच्या मंडळींची 'डिमांड' काही कमी झाली नाही. संसाराचा गाडा थोडा पुढे पुढे सरकायला लागला की सासरची मंडळी माहेरहून हे आण, ते आण म्हणून तिच्याकडे 'डिमांड' करायचे. आई-वडिलांनी ह्यांना कितीही दिले तरी कमीच असतं हे प्रणालीला कळून चुकलं होत. अनेकदा 'ती' गप्प बसुन सासरच्या मंडळींचा छळ सहन करत गेली. यातच 'गोड' बातमी कळल्यानंतर ती होणाऱ्या छळाकडे दुर्लक्ष करत गेली. काही महिन्यांपूर्वी तिने एक गोंडस मुलीला जन्म दिला. आई झाल्याच्या आनंदात ती न्हाहून निघाली. पण तो क्षणही तिच्यासाठी क्षणिकच होता. मुलगी झाली म्हणून सासरची मंडळी नाराज होती. तिला बघायलाही कोणी आले नाही. आनंदाच्या क्षणी सासरच्या मंडळींचे असे वर्तन बघून तिला मानसिक धक्काच बसला. महिना, दोन महिने, तीन महिने उलटूनही सासरच्या मंडळींच्या अशा वर्तनामुळे ती मानसिक तणावात होती. माहेरी असताना नवरा-बायको यांच्यात फोनवर वाद झाला अन प्रणालीने मागचा-पुढचा विचार न करता टोकाचे पाऊल उचलून गळफास घेतला. तिच्या या निर्णयामुळे जसा आम्हाला धक्का बसला त्याही पेक्षा जास्तच तिच्या आई- वडिलांना बसलेला असेल. कोणाचं मन न दुखवणारी, हसऱ्या स्वभावाची मुलगी तिच्या एका निर्णयामुळे सर्वांना रडवत आहे. नराधम पती, हावरट स्वभावाची सासरची मंडळी यांना तू धडा शिकवायला हवा होता. परंतु, प्रणाली तुझी काहीही चूक नसताना तू स्वतःला शिक्षा करून घेतलीय. असं तू खरंच करायला नको होतंस. तुझा छळ करणाऱ्या प्रत्येकाला न्याय व्यवस्था शिक्षा देईल, पण तुझ्या त्या गोंडस मुलीच्या भविष्याचा तू विचार करायला हवा होतास. असतात गं सासरच्याकडील मंडळी हावरट. त्यांना कितीही केलं आणि कितीही दिलं तरी कमीच असते. मुलीसाठी आई-वडील काय काय सहन करतात हे कदाचित अनेकांना कळत नाही, कारण त्यांना मुलगी नसते ना. मुलगा म्हणजेच त्यांच्यासाठी सर्वकाही असतो. 'पती' म्हणजे हक्क गाजवणारा असतो. तो म्हणेल, सासरची मंडळी म्हणेल तीच दिशा त्यांच्यासाठी योग्य असते. हे तुला कळून चुकलं असेलच म्हणूनच रोजच्या छळाला कंटाळून तू मुक्ती मिळवून घेतलीय गं. पण या जगात असा त्रास सहन करणारी तू एकटी नव्हतीस हे कदाचित तू विसरली असावी. तुझ्यासारखे दुःख सहन करणाऱ्या अनेक 'प्रणाली' आजच्या घडीला सासरची मंडळी, पतींचा त्रास सहन करताय. त्यांच्याप्रमाणे तुही मनाने सक्षम राहून त्यांना धडा शिकविण्यासाठी दोन हात करायला हवे होतेस. होऊन होऊन काय झालं असत, तुला लोकांनी नाव ठेवलं असत. लोकांचे कामच असतं गं नाव ठेवणं. त्याकडे दुर्लक्ष करून तू त्या नराधमांना न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून धडा शिकवायचा होतास. प्रणाली, तू संयम बाळगायला हवा होतास. पण असं टोकाचं पाऊल उचलायला नको होतंस. देव तुझ्या आत्म्यास शांती देवा, भावपूर्ण श्रद्धांजली.